बेळगाव – “आपली संस्कृती टिकवायची असेल तर प्रथम भाषा टिकली पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने मुलांना मातृभाषेतून शिक्षण दिले पाहिजे आणि त्यांना आपल्या संस्कृतीची जाण करून दिली पाहिजे,” असे विचार आर. पी. डी. महाविद्यालयाचे मराठी विभागाचे प्राध्यापक महादेव खोत यांनी व्यक्त केले.
सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित “अभिजात मराठी भाषा गौरव सप्ताह” या उपक्रमाच्या दुसऱ्या दिवशी “मराठी भाषा आणि संस्कृती” या विषयावर ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, “कोणतीही भाषा संपत नाही, पण प्रत्येक भाषेला टिकण्यासाठी संघर्ष करावा लागतो. संकटे छत्रपती शिवाजी महाराजांनाही आली होती, पण त्यांनी हार मानली नाही. तशीच संकटे आपल्या भाषेवर आणि वाचनालयांवर आली, पण त्यांनी संघर्ष करूनच आपले अस्तित्व टिकवले आहे. त्यामुळे आजही वाचनालये शेकडो वर्षांपासून कार्यरत आहेत.”
कार्यक्रमाच्या प्रारंभी वाचनालयाचे संचालक रघुनाथ बांडगी यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्षस्थानी अनंत लाड होते. प्रा. खोत यांचे स्वागत अनंत लाड यांनी केले. सुनीता मोहिते यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रसन्न हेरेकर यांनी आभार मानले.
उपाध्यक्ष डॉ. विनोद गायकवाड, संचालक, कर्मचारी व अनेक निमंत्रित या कार्यक्रमास उपस्थित होते.
रविवारचा कार्यक्रम:
सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी बाल शिवाजी वाचनालय, मच्छे चे माजी अध्यक्ष बजरंग धामनेकर यांचे “मराठी भाषेचा प्रवास” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सर्वांनी या व्याख्यानास उपस्थित राहावे, असे आवाहन सार्वजनिक वाचनालयातर्फे करण्यात आले आहे.
