बेळगाव – सामाजिक, सहकार आणि राजकीय क्षेत्रात गेली अनेक दशके सक्रिय राहून योगदान देणारे महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक श्री नेताजीराव जाधव यांचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात १५ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थमंत्री तसेच शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष श्री जयंतराव पाटील हे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी अमृत महोत्सव स्वागत समितीचे अध्यक्ष श्री प्रकाश मरगाळे, चिटणीस श्री प्रभाकर भागोजी, सदस्य श्री शिवाजीराव हंगिरकर, श्री श्रीधर (बापू) जाधव आणि श्री विजय जाधव यांनी इस्लामपूर येथे श्री जयंतराव पाटील यांची भेट घेऊन औपचारिक निमंत्रण दिले.
श्री पाटील यांनी या प्रसंगी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे मान्य केले असून, त्यांच्या उपस्थितीमुळे या अमृत महोत्सवाला विशेष औचित्य लाभणार आहे.
