बेळगांव : केळकर बाग, बेळगाव येथे “बेळगावची आदिशक्ती” नवरात्र उत्सव मंडपात घडलेल्या एका घटनेने समाजमनाला चटका लावला आहे. देवीच्या ओटीसाठी ठेवलेल्या साड्या, खण, नारळ आणि फळे चोरी झाल्याची घटना उघड झाली. परंतु या प्रकाराकडे फक्त चोरी म्हणून पाहणे अन्यायकारक ठरेल, असा सूर नागरिकांतून उमटत आहे.
एका स्त्रीला उदरनिर्वाहासाठी देवीसमोर ठेवलेली ओटीची साडी वा खण चोरावे लागते, यामागे तिची नाही तर संपूर्ण समाजाची चूक आहे. अशा गरजू महिलांना मदत करून त्यांना सक्षम करणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे मत मंडळ सदस्य आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
आज बेळगावात अनेक मंडळे “माझा उत्सव मोठा की तुझा” हे दाखवण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करतात. मात्र, हा खर्च न करता मंडळांनीच समाजातील गरजू लोकांसाठी मदतीचे हात पुढे केले, तर कुणालाही अशा बिकट परिस्थितीत चोरीचा आधार घ्यावा लागणार नाही.
“उत्सव सक्षम करण्यासोबतच समाजातील गरजू लोकांनाही सक्षम करणे हेच खरे मंडळाचे कर्तव्य आहे,” असा ठाम संदेश या घटनेतून समोर आला आहे.
