बेळगाव : शहरातील सेंट्रल बस स्टॅन्ड परिसरात प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या एका महिला आरोपीला मार्केट पोलिसांनी अखेर गजाआड केले आहे. मोनीषा मनीगंडण (वय 28, रा. तिरुपट्टूर, जोलरपट्टी, वेल्लोर – तमिळनाडू) असे तिचे नाव असून तिच्याकडून तब्बल ५१ ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार जप्त करण्यात आला आहे. जप्त हाराची किंमत सुमारे पाच लाख 65 हजार रुपये इतकी आहे.
घडलेली घटना अशी की, 18 फेब्रुवारी 2024 रोजी निपाणी येथील ज्योती पाटील बसमधून बेळगाव सेंट्रल बस स्थानकात उतरत असताना त्यांच्या गळ्यातील सोन्याचा हार चोरीला गेला होता. या घटनेनंतर त्यांनी तत्काळ मार्केट पोलीस स्थानकात फिर्याद नोंदवली होती. प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला.
मार्केट पोलीस निरीक्षक महंतेश द्यामन्नावर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सातत्यपूर्ण तपास करत अखेर आरोपी महिलेचा मागोवा घेत तिला अटक केली. तिच्याकडून चोरीस गेलेला हारही जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा यशस्वी उलगडा केल्याबद्दल पोलीस आयुक्तांनी मार्केट पोलिसांचे कौतुक करून अभिनंदन केले आहे. या कारवाईमुळे सेंट्रल बस स्टॅन्ड परिसरातील प्रवाशांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे.
