बेळगाव : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ श्रींगरी कॉलनी, बाडीवाले कॉलनी व टीचर्स कॉलनीच्या वतीने यंदाचा गणेशोत्सव विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
महिलांसाठी आयोजित हळदीकुंकू समारंभास उपमहापौर वाणी जोशी, नगरसेविका प्रीती कामकर, एंजल फाऊंडेशनच्या मीनाताई बेनके व सौ. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सुमारे 450 महिलांनी सहभाग घेतला. तसेच सत्यनारायण महापूजा, विष्णु सहस्रनाम जप, अन्नपूर्णेश्वरी मंत्रपठण व महाआरतीनंतर मोठ्या प्रमाणावर महाप्रसादाचे वाटप आमदार अभय पाटील यांचे बंधू शितल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
लहान मुलांसाठी फिट इंडिया–स्ट्राँग इंडिया वॉकिंग रॅली, धावण्याची शर्यत, करम, बुद्धिबळ, क्रिकेट, फुटबॉल, चित्रकला, नृत्य व गाण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या. गणपती विसर्जन मिरवणुकीस आमदार अभय पाटील यांनी पूजा करून चालना दिली. यावेळी त्यांचा शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावर्षी मंडळाला दिलेल्या गणेशमूर्तीबद्दल विश्वनाथ येळूरकर यांचा आमदारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला समाजसेवक, उद्योजक व विविध मान्यवरांनी भेट देऊन सहकार्य केले.
या सर्व उपक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी स्वागताध्यक्ष अॅड. शिवकुमार उडकेरी, अध्यक्ष तुकाराम शिंदे, गुरुजींसह कार्यकर्ते व स्वयंसेवकांनी मोठे परिश्रम घेतले.
