बेळगाव : युवजन सेवा क्रीडा खाते, जिल्हा आडळीत व जिल्हा पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय दसरा जलतरण स्पर्धा गोवावेस येथील महानगरपालिकेच्या जलतरण तलावात मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक जलतरणपटूंनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
पुरुष गटात तनुज सिंगने चार सुवर्ण पदक पटकावत वैयक्तिक चॅम्पियनशिप मिळवली. दर्शन वरूरने तीन सुवर्ण, स्वयं कारेकरने एक सुवर्ण व दोन कांस्य, अर्णव किल्लेकरने एक सुवर्ण एक कांस्य, आदी शिरसाठने चार रौप्य, स्मरण मंगळूरकरने तीन रौप्य व एक कांस्य, अभिनव देसाईने दोन रौप्य दोन कांस्य मिळवले. तर मयुरेश जाधव, प्रजित मयेकर व सिद्धार्थ कुरुंदवाड यांनी प्रत्येकी एक कांस्य पदक पटकावले.
महिला गटात वेदा खानोलकरने पाच सुवर्ण पदके जिंकून वैयक्तिक चॅम्पियनशिप मिळवली. श्रेष्ठा रोटीने दोन सुवर्ण, एक रौप्य, एक कांस्य, निधी मुचंडीने एक सुवर्ण, दोन रौप्य, दोन कांस्य, मनस्वी मुचंडीने एक सुवर्ण एक रौप्य, प्रणाली जाधवने तीन रौप्य व एक कांस्य, वैशाली घाटेगस्तीने दोन रौप्य दोन कांस्य, तर ओवी जाधवने दोन कांस्य पदकं जिंकली.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आबा हिंद स्पोर्ट्स क्लबचे प्रशिक्षक विश्वास पवार तसेच रणजीत पाटील, संदीप मोहिते, शिवराज मोहिते, कल्लाप्पा पाटील, विजय नाईक, प्रांजल सुळधाळ, शुभांगी मंगळूरकर, विजया शिरसाट, ज्योती पवार, वैभव खानोलकर, विशाल वेसणे, विजय बोगन, किशोर पाटील, मोहन पत्तार व ओम घाडी यांनी विशेष परिश्रम घेतले.
या स्पर्धेतील प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवलेल्या जलतरणपटूंची निवड बेळगाव विभागीय दसरा जलतरण स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. या स्पर्धा येत्या 15 सप्टेंबर रोजी अशोक नगर येथील आंतरराष्ट्रीय महानगरपालिकेच्या जलतरण तलावात होणार असून सर्व पात्र खेळाडूंनी सकाळी दहा वाजता हजर राहावे, असे आवाहन युवजन सेवा क्रीडा खात्यांतर्फे करण्यात आले आहे.