मुंबई: महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या मूळ याचिका क्रमांक 4 / 2004 मध्ये कायदेशीर सल्ला देण्यासाठी गठित करण्यात आलेल्या तज्ञ समितीची बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या 3 जुलै 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार लोकसभा सदस्य धैर्यशील माने यांची तज्ञ समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक बुधवार, 10 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजता मंत्रालयातील समिती कक्ष क्र. 5, सातवा मजला येथे होणार आहे.
या बैठकीस लोकसभा सदस्य धनंजय महाडिक सहअध्यक्ष या नात्याने उपस्थित राहणार असून, अप्पर मुख्य सचिव व सदस्य सचिव तज्ञ समिती, वरिष्ठ विधी सल्लागार तसेच तज्ञ समितीचे इतर मान्यवर सदस्य आणि विधीज्ञ उपस्थित राहतील.
सदर बैठकीसाठी विशेष निमंत्रित म्हणून एड. शिवाजीराव जाधव, एड. संतोष काकडे, दिनेश ओउळकर, मध्यवर्ती समिती अध्यक्ष , ॲड महेश बिर्जे, ॲड राजाभाऊ पाटील, रमाकांत कोंडुस्कर आणि प्रा. आनंद आपटेकर आदींना आमंत्रित करण्यात आले आहे. याशिवाय चंद्रकांत पाटील (सीमा प्रश्न समन्वय मंत्री), शंभूराज देसाई (सीमा प्रश्न समन्वय मंत्री), हसन मुश्रीफ (वैद्यकीय शिक्षण मंत्री), प्रकाश आबिटकर (सार्वजनिक आरोग्य मंत्री) हे मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीत महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयीन लढाईसाठी पुढील कायदेशीर धोरण ठरविण्याबाबत सविस्तर चर्चा होणार आहे.