१ नोव्हेंबरच्या निषेध फेरीत मोठ्या संख्येने सहभागी व्हा!

१ नोव्हेंबरच्या निषेध फेरीत मोठ्या संख्येने सहभागी व्हा!

तालुका व जिल्हा पंचायत निवडणुकांच्या तयारीसाठी विभागवार बैठका घेण्यावर भर

बेळगाव : प्रतिनिधी

१ नोव्हेंबर काळा दिनाच्या पार्श्वभूमीवर निषेध फेरीत मोठ्या संख्येने सहभागी होण्यासह आगामी तालुका पंचायत व जिल्हा पंचायत निवडणुकांच्या तयारीला आतापासूनच सुरुवात करण्याचा निर्धार बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आला. मराठा मंदिर येथे माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

बैठकीच्या सुरुवातीला समितीच्या तालुक्यातील दिवंगत कार्यकर्त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर माजी आमदार मनोहर किणेकर यांनी बैठकीचे प्रयोजन स्पष्ट करत १ नोव्हेंबरच्या कार्यक्रमासह आगामी निवडणुकांच्या दृष्टीने संघटनात्मक तयारीबाबत चर्चा केली.

लढ्याच्या वेळी कार्यकर्त्यांची उपस्थिती वाढविण्याची गरज

यावेळी शिवाजी खांडेकर यांनी बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या कार्यकर्त्यांबद्दल खंत व्यक्त केली. विशेषतः समितीमध्ये पदे देण्यात आलेल्या व्यक्तीही बैठकीला उपस्थित नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. निवडणुकीच्या वेळी अनेक जण सक्रिय असतात; मात्र सीमाप्रश्नाच्या लढ्याच्या वेळी कार्यकर्त्यांची उपस्थिती कमी होते, ही बाब चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले.

समितीचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी विभागनिहाय बैठका घेणे, गावागावांत जाऊन परिपत्रके वितरित करणे आणि मराठी जनतेपर्यंत सीमाप्रश्नाची भूमिका पोहोचविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आत्मचिंतन करून संघटनात्मक कामाला अधिक गती देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

निवडणुकांच्या तयारीला आतापासूनच सुरुवात करा

नारायण सांगावकर यांनी आगामी तालुका पंचायत व जिल्हा पंचायत निवडणुकांच्या तयारीला आतापासूनच सुरुवात करण्याची सूचना केली. निवडणुकीच्या वेळी घाई करण्याऐवजी संघटनात्मक पातळीवर नियोजन करून कार्यकर्त्यांना सक्रिय करणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

पियूष हावळ यांनी समितीच्या काही संघटनांमध्ये निर्माण झालेल्या अंतर्गत वादांकडे नेतृत्वाचे लक्ष वेधले. हे वाद तातडीने मिटविणे आवश्यक असून, अंतर्गत मतभेद आणि वैयक्तिक वादांचा सीमाप्रश्नाच्या लढ्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले.

समितीच्या व्यापक हितासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे, तसेच आगामी निवडणुकांच्या दृष्टीने आतापासूनच विभागवार बैठका घेऊन नियोजन करावे, अशी सूचना त्यांनी केली.

१ नोव्हेंबरला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

आर. एम. चौगुले यांनी १ नोव्हेंबरच्या निषेध फेरीत मराठी जनतेने मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. यासाठी विभागवार बैठका घेऊन जनजागृती करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. तसेच आगामी तालुका पंचायत व जिल्हा पंचायत निवडणुकांसंदर्भात १ नोव्हेंबरनंतर स्वतंत्र बैठक बोलावून सविस्तर चर्चा करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

बैठकीत दीपक पावशे, मनोहर संताजी, आर. के. पाटील, राजू किणेकर, रामचंद्र मोगेकर यांच्यासह इतरांनीही आपले विचार मांडले.

सीमाप्रश्नाच्या लढ्याला बळ देण्याचा निर्धार

बैठकीत १ नोव्हेंबरच्या निषेध फेरीत मोठ्या संख्येने सहभागी होणे, मराठी जनतेला संघटित करणे आणि सीमाभागातील मराठी जनतेचा आवाज बुलंद करणे यावर विशेष भर देण्यात आला. तसेच समितीतील अंतर्गत मतभेद दूर करून संघटनात्मक एकजूट मजबूत करणे आणि आगामी तालुका पंचायत व जिल्हा पंचायत निवडणुकांसाठी नियोजनबद्ध तयारी करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली.

सीमाप्रश्नाच्या लढ्याला नव्याने बळ देण्यासाठी मराठी जनतेने एकजुटीने पुढे यावे आणि १ नोव्हेंबरच्या निषेध फेरीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

10 + ten =

error: Content is protected !!