चलवेनहट्टी स्मशानभूमीत निवारा शेड उभारणीचे भूमिपूजन; आई-वडिलांच्या स्मरणार्थ कुणाल पाटील यांचा पुढाकार

चलवेनहट्टी स्मशानभूमीत निवारा शेड उभारणीचे भूमिपूजन; आई-वडिलांच्या स्मरणार्थ कुणाल पाटील यांचा पुढाकार

बेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव तालुक्यातील चलवेनहट्टी येथील नवीन स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी येणाऱ्या ग्रामस्थांची गैरसोय दूर करण्याच्या उद्देशाने निवारा शेड उभारण्यात येणार आहे. या शेडच्या कामाचे भूमिपूजन कुणाल पाटील यांच्या हस्ते ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले. आपल्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ त्यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे.

चलवेनहट्टी येथे तीन ते चार वर्षांपूर्वी नवीन स्मशानभूमीसाठी जागा निश्चित करण्यात आली होती. सरकारी स्तरावरील आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या जागेवर अंत्यविधी सुरू झाले. मात्र, निवारा शेड नसल्यामुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. उन्हाळ्यात कडक उन्हाचा त्रास सहन करावा लागत होता, तर पावसाळ्यात पावसात भिजत अंत्यविधी पार पाडण्याची वेळ येत होती. स्मशानभूमीत झाडांचीही कमतरता असल्याने ही गैरसोय अधिकच जाणवत होती.

दरम्यान, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अंत्यविधीसाठी अग्निदानाची शेड आणि शेगडीची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, अंत्यविधीसाठी उपस्थित राहणाऱ्या नातेवाईकांना आणि ग्रामस्थांना निवारा उपलब्ध व्हावा, ही गरज कायम होती.

काही काळापूर्वी कुणाल पाटील यांच्या आईचे ऐन उन्हाळ्यात निधन झाले. बालवयातच वडिलांचे छत्र हरवलेल्या कुणाल यांच्यावर आईच्या निधनामुळे दुःखाचा डोंगर कोसळला. या दुःखद प्रसंगात अंत्यविधीसाठी आलेल्या नातेवाईकांना आणि ग्रामस्थांना उन्हाचा सामना करावा लागत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. स्वतःच्या दुःखातून सावरल्यानंतर इतर ग्रामस्थांना अशी गैरसोय सहन करावी लागू नये, या भावनेतून त्यांनी आई-वडिलांच्या स्मरणार्थ निवारा शेड बांधून देण्याची इच्छा व्यक्त केली.

ग्रामस्थांच्या पुढाकारातून या कामासाठी २० फूट बाय ३० फूट आकाराच्या शेडची जागा निश्चित करण्यात आली. त्यानंतर कुणाल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या उपक्रमामुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या ग्रामस्थांना उन्हापासून आणि पावसापासून संरक्षण मिळण्यास मदत होणार आहे.

यावेळी ग्रामस्थांच्या वतीने मनोहर हुंदरे यांनी कुणाल पाटील यांचे आभार मानले. कार्यक्रमाला विठ्ठल कलखांबकर, लक्ष्मण बडवाण्णाचे, यल्लाप्पा हुंदरे, नारायण पाटील, यल्लाप्पा कितवाडकर, अमोल बडवाण्णाचे, किरण हुंदरे, युवराज पाटील, मारुती अलगोंडी,राजू हुंदरे, उमेश पाटील आणि गजानन बडवाण्णाचे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

दुःखद प्रसंगातून समाजोपयोगी कार्याची प्रेरणा घेत आई-वडिलांच्या स्मरणार्थ उभारण्यात येणारा हा निवारा शेडचा उपक्रम गावासाठी उपयुक्त ठरणार आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

8 + nine =

error: Content is protected !!