कसबा नंदगड : सरकारी प्राथमिक मराठी मुला-मुलींच्या शाळेतील २००५-०६ सालच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा तब्बल २० वर्षांनंतर मोठ्या उत्साहात पार पडला. शुक्रवार, दिनांक २९ ऑगस्ट २०२५ रोजी कसबा नंदगड येथे आयोजित या मेळाव्यात २५ हून अधिक माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच सर्व गुरुजनांच्या उपस्थितीने कार्यक्रम अविस्मरणीय ठरला.
कार्यक्रमाची सुरुवात शिक्षक आणि शिक्षिका यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. शाळेच्या मुलींनी ईशस्तवन आणि स्वागतगीत सादर केले. स्वागत श्री. टि. आर. गुरव सर यांनी केले तर प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. ए. एम. शिंदे यांनी केले. अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत करडी होते.
या वेळी सर्व गुरुजनांचा माजी विद्यार्थ्यांनी शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त श्री. टि. आर. गुरव सर आणि आदर्श शिक्षिका पुरस्कारप्राप्त सौ. भारती पाटील यांचा विशेष गौरव करण्यात आला. तसेच भारतीय सैन्यात कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थी यल्लोजी नागोजी पाटील याचाही सन्मान करण्यात आला.
शाळेला भेटवस्तू स्वरूपात संगणक देण्यात आला तसेच पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना पुठ्ठ्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी सी.आर.पी. नंदगड विभागाचे श्री. डी. एम. बागवान, शाळा सुधारणा समितीचे सभासद, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षकांनी शालेय आठवणींना उजाळा देत मार्गदर्शनपर विचार मांडले. माजी विद्यार्थी महेंद्र पाटील व भूषण पाटील यांनी गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. कसबा नंदगड आणि भुत्तेवाडी गावातील माजी विद्यार्थ्यांनी या स्नेहमेळाव्याचे आयोजन यशस्वी करण्यासाठी मोठे योगदान दिले.
श्री. एल. आय. देसाई सरांनी केलेल्या सुंदर सूत्रसंचालनाने वातावरण उत्साहपूर्ण झाले तर आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.