बेळगाव : सीमाभागातील विद्यार्थ्यांनी माफक शुल्कात उच्च शिक्षण घेण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रातून सुरू करण्यात आलेल्या विविध अभ्यासक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव विनय शिंदे यांनी केले.
विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या अभ्यासक्रमांची माहिती देण्यासाठी म.ए. समितीतर्फे ओरिएंटल हायस्कूल येथील तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन येथे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या वेळी व्यासपीठावर माजी आमदार व म.ए. समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, विद्यापीठाचे समन्वयक डॉ. चांगदेव बंडगर, डॉ. सचिन भोसले तसेच मराठा समाज सुधारणा मंडळाचे कार्याध्यक्ष शिवराज पाटील उपस्थित होते.
डॉ. भोसले यांनी विविध डिग्री, डिप्लोमा व सर्टिफिकेट कोर्सेस, अभ्यास केंद्रांची माहिती तसेच शैक्षणिक आणि करिअर विकासाच्या संधींबाबत मार्गदर्शन केले. पदवी घेऊ इच्छिणारे युवक-युवती, स्पर्धा परीक्षांचे अभ्यासक, सैनिक, नोकरदार, गृहिणी, उद्योजक, शेतकरी आणि कामगार यांच्यासाठी दूरशिक्षणाच्या सोयी उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी उपस्थित विद्यार्थी व पालकांनी विचारलेल्या प्रश्नांना विनय शिंदे व डॉ. बंडगर यांनी सविस्तर उत्तरे दिली. स्वागत शिवराज पाटील यांनी केले. कार्यक्रमाला म.ए. समिती युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, बाबू कोले, श्रीकांत कदम, सुरज कुडुचकर, भाऊसाहेब कातकर, उमेश पाटील यांच्यासह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.