बेळगाव : शहरातील स्वच्छता व्यवस्थापनात मोठा बदल करत महानगरपालिकेने घंटागाडीतून कचरा गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कपात केली असून त्यांना अन्य स्वच्छता कामामध्ये व्यस्त केले आहे. मात्र या निर्णयामुळे प्रत्यक्ष कचरा संकलनात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
यापुढे घंटागाडी नागरिकांच्या घरासमोर येईल, पण कचरा गाडीत टाकण्याची जबाबदारी नागरिकांवरच टाकण्यात आली आहे. विशेष करून उपनगरीय भागात आतापर्यंत नागरिक कामावर जाताना घरासमोर डस्टबिनमध्ये कचरा ठेवत असत आणि घंटागाडी आल्यावर कर्मचारी तो गाडीत टाकून रिकामा डस्टबिन परत ठेवत होते. यामुळे नागरिकांना मोठी सोय होत होती.
पण आता कर्मचारी नसल्याने सकाळी लवकर घंटागाडी आल्यास नागरिकांना स्वतः उपस्थित राहून कचरा द्यावा लागणार आहे. जर कचरा गाडी चुकली, तर उघड्यावर कचरा फेकण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे स्वच्छतेवर परिणाम होईल का, हा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
सध्या ऐन सणासुदीच्या काळात घेतलेल्या या निर्णयामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजी व्यक्त होत आहे. कचऱ्याची समस्या अधिक गंभीर होऊ नये म्हणून महानगरपालिकेने तातडीने लक्ष घालण्याची गरज व्यक्त केली जात आहे.