बेळगाव : आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरून होणाऱ्या भडकाऊ पोस्ट आणि अफवांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. आज पोलीस कमिशनर कार्यालयात शहरातील विविध आघाडीच्या सोशल मीडिया न्यूज चॅनल्स व पोर्टल्सच्या प्रतिनिधींची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती.
या वेळी बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना स्पष्ट केले की, सणासुदीच्या काळात कोणत्याही प्रकारची भडकाऊ पोस्ट, अफवा किंवा समाजातील शांतता भंग करणारे कमेंट्स केल्यास त्वरित गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल. यापूर्वी अशा पोस्ट हटवून संबंधितांना ताकीद दिली जात होती; मात्र आता परिस्थिती लक्षात घेऊन थेट एफ.आय.आर. दाखल केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
गणेशोत्सव काळात शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढत असल्याने शिस्त व शांतता राखणे अत्यावश्यक आहे. यासंदर्भात पोलीस आयुक्तांनी सोशल मीडिया अकाउंट्स चालवणाऱ्या प्रशासक व पत्रकारांना जबाबदारीने व संवेदनशीलतेने वागण्याचे आवाहन केले. तसेच, उत्सव काळात उद्भवणाऱ्या अडचणींबाबतही त्यांनी माहिती घेतली.
या बैठकीत बेळगाव परिसरातील प्रमुख सोशल मीडिया अकाउंट्सचे अॅडमिन, ऑनलाइन न्यूज पोर्टल्सचे प्रतिनिधी आणि स्थानिक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी पोलिस प्रशासनाच्या या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले असून, नागरिकांनाही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.