वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण; प्रशांत पाटील यांचा पर्यावरणपूरक आदर्श उपक्रम

वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण; प्रशांत पाटील यांचा पर्यावरणपूरक आदर्श उपक्रम

कंग्राळी खुर्द : वाढदिवस साजरा करण्याची अनोखी आणि समाजोपयोगी परंपरा जपत माजी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पाटील यांनी यंदाही पर्यावरणपूरक उपक्रम राबवत मराठी व कन्नड शाळांच्या आवारात वृक्षारोपण केले. त्यांच्या या उपक्रमाचे ग्रामस्थ, शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून कौतुक करण्यात आले.

वाढदिवसानिमित्त प्रशांत पाटील यांनी पहाटे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन केले. त्यानंतर मराठी शाळेच्या मैदानावर व्यायाम करणाऱ्या पैलवान व तरुणांच्या सहकार्याने शाळेच्या परिसरातील घाण झालेल्या भिंती स्वच्छ करण्यात आल्या.

यानंतर सकाळी १० वाजता मराठी व कन्नड शाळांच्या आवारात शोभेची व चाफ्याची झाडे लावून वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाला एसडीएमसी अध्यक्ष विक्रम मुतगेकर, ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लापा पाटील, सदस्य राकेश पाटील, विनायक कम्मार, वैजनाथ बेन्नाळकर, महेश धामणेकर, केंपान्ना सनदी, माजी जवान सोमनाथ पाटील, पंडित पाटील, पीडीओ गोपाळ नाईक, निवृत्त मुख्याध्यापक शिवाजी जाधव, बाबू पावशे, शुभम पैलवान, बबन पैलवान, बाळू देसाई, मुख्याध्यापक लाड सर, सीआरसी, बीआरसी अधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी टी. डी. पाटील, आर. एस. पाटील आणि यल्लापा पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना प्रशांत पाटील हे दरवर्षी वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवत असल्याचे सांगितले. यापूर्वी त्यांनी शैक्षणिक साहित्य वाटप, रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, बसथांबा दुरुस्ती तसेच दिव्यांगांना मदत असे विविध उपक्रम राबविले असून, तरुणांनीही त्यांचा आदर्श घेऊन वाढदिवस समाजहिताच्या कार्यातून साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले.

शाळा प्रशासनाने लावण्यात आलेल्या वृक्षांचे संगोपन व संवर्धन करण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमास ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी आणि प्रशांत पाटील यांचे अनेक शुभचिंतक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन किसन पाटील यांनी केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

nine − 3 =

error: Content is protected !!