बेळगाव – सीमाभागातील सर्वात पहिला गणपती आगमन सोहळा संपन्न. ‘बेळगावचा राजा’म्हणून ओळखला जाणाऱ्या गणपतीचा भव्य आगमन सोहळा शुक्रवारी रात्री धर्मवीर संभाजी चौकात मोठ्या जल्लोषात पार पडला. दरवर्षीप्रमाणे यंदाही या सोहळ्यासाठी हजारो गणेश भक्तांनी संध्याकाळपासूनच चौकात हजेरी लावली होती. रात्री अकरा वाजता तब्बल 18 फूट उंचीच्या ‘बेळगावचा राजा’चे दिमाखदार आगमन होताच संपूर्ण परिसर ढोल-ताशांच्या गजराने आणि भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.
पावसानेही आगमनाच्या क्षणी विश्रांती घेतली आणि बाप्पाच्या पहिल्या झलकने बेळगावकरांना आनंदात न्हाऊ घातले. या सोहळ्यामुळे परिसरात प्रचंड गर्दी उसळली होती. महामार्गावरसुद्धा अनेकांनी वाहनं थांबवून बाप्पाचे दर्शन घेतल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. गर्दी नियमनासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता.
कार्यक्रमात ‘बेळगावचा राजा’चे पूजन पोलीस उपयुक्त नारायण बरमणी, माजी आमदार अनिल बेनके, भाजप नेते मुरगेंद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते शोल्क राजू कडोलकर, रोहित रावळ यांच्या हस्ते पार पडले. मंडळाचे अध्यक्ष श्रीनाथ पवार आणि कार्याध्यक्ष सुनिल जाधव यांच्यासह असंख्य गणेश भक्त उपस्थित होते.
ही भव्य मूर्ती सुप्रसिद्ध मूर्तिकार रवी लोहार यांनी साकारली असून ती प्रभावळीसह तब्बल 21 फूट उंच आहे. रात्री आठ वाजेपासूनच गर्दीचा महापूर येऊ लागला होता. पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने गतवर्षीचा अनुभव लक्षात घेऊन साऊंड सिस्टीम असलेली वाहने मूर्तीजवळ पोहोचू दिली नव्हती.
उत्साह, भक्तीभाव आणि ढोल-ताशांच्या गजरात झालेला ‘बेळगावचा राजा’ गणपतीचा हा आगमन सोहळा उशिरापर्यंत सुरू राहिला. संपूर्ण शहरात बाप्पा मोरया! या जयघोषाने वातावरण दुमदुमले होते.