बेळगाव (प्रतिनिधी) : चव्हाट गल्ली बेळगाव येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरा होणाऱ्या बेळगावचा राजा सार्वजनिक गणेशोत्सवाच्या तयारीसंदर्भात मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. उत्सव काळात उद्भवणाऱ्या अडचणी, कायदा आणि सुव्यवस्था यावर यावेळी चर्चा करण्यात आली.
पोलीस आयुक्तांनी निवेदन स्वीकारत मंडळाला कायद्याचे पालन करून आनंदात व उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. विसर्जन मिरवणुकीत वेळेबाबत निर्माण होणारे वाद सामोपचाराने मिटविण्याचा सल्ला देत मंडपांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच मंडपातील सजावट, बॅनर व देखाव्यात कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची खबरदारी घेण्याचे सांगून सामाजिक बांधिलकी जपणारे व समाजप्रबोधन करणारे कार्यक्रम आयोजित करावेत, असेही त्यांनी नमूद केले. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
मंडळाचे कार्याध्यक्ष सुनील जाधव यांनी सांगितले की, “चव्हाट गल्लीतील आठ हजारांहून अधिक लोकसंख्येमुळे प्रत्येक घरासमोर गणेशाचे स्वागत केले जाते, यामुळे मिरवणुकीला उशीर होतो. मात्र यावर्षी शक्य तितक्या लवकर मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी प्रयत्न करू,” असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी विनायक पवार यांनी सांगितले की, “गल्लीतील युवकांच्या एकजुटीमुळे दरवर्षी उत्सव शांततेत पार पडतो. मोठ्या संख्येने भाविक गणपतीच्या दर्शनासाठी येतात. सामाजिक बांधिलकी म्हणून पंधराशे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र संवेदनशील भागातून महिला दर्शनाला येत असल्याने महिला पोलीस बंदोबस्त ठेवावा,” अशी मागणीही त्यांनी केली.
या चर्चेस मंडळाचे अध्यक्ष श्रीनाथ पवार, सत्यम नाईक, वृषभ मोहिते, रोहन जाधव, निशा कुडे, सौरभ पवार, हर्षल नाईक, गौतम पाटील, उमेश मेणसे, अनंत हांगीरगेकर, हरीश ताशीलदार यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
👉 बैठकीनंतर उत्सव शांततेत, कायदा-सुव्यवस्था राखून आणि वैभवात पार पाडला जाईल, असा विश्वास मंडळ पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.