बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव तालुक्यातील रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजवावेत व रस्त्यांची दुरुस्ती तातडीने हाती घ्यावी, या मागणीसाठी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज बुधवार, दिनांक १३ रोजी सकाळी ११ वाजता किल्ला येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या (पीडब्ल्यूडी) कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले.
पावसाळ्यामुळे तालुक्यातील अनेक रस्त्यांवर पाणी साचून मोठे खड्डे पडले असून, रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. या खड्ड्यांमुळे नागरिकांना प्रवास करताना जीव मुठीत धरावा लागत आहे, तसेच अनेक किरकोळ अपघातांची नोंद झाली आहे. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्तांची गैरसोय टाळण्यासाठी उत्सवापूर्वीच रस्त्यांची दुरुस्ती व डागडुजी पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी समितीकडून करण्यात आली.
या निवेदनादरम्यान बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर व सरचिटणीस ॲड. एम. जी. पाटील कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले, उपाध्यक्ष लक्ष्मण होनगेकर, रामचंद्र मोदगेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.