विचारांच्या अभिव्यक्तीसाठी कवीने सातत्याने लिहित राहिले पाहिजे : कवी अजय कांडर:

विचारांच्या अभिव्यक्तीसाठी कवीने सातत्याने लिहित राहिले पाहिजे : कवी अजय कांडर:

शब्दगंध कविमंडळाच्या काव्यलेखन कार्यशाळेत मार्गदर्शन; चांगल्या कवितेसाठी वाचन, आत्मसंवाद आणि आशय महत्त्वाचा

बेळगाव :
“जेव्हा कविता मरते, तेव्हा भाषा मरते आणि भाषा मरताच संस्कृतीचा ऱ्हास सुरू होतो. भाषा आणि संस्कृती जपण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे कविता. त्यामुळे वैश्विक विचार मांडण्यासाठी आणि विचारांच्या अभिव्यक्तीसाठी प्रत्येक कवीने सातत्याने लिहित राहिले पाहिजे,” असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी अजय कांडर यांनी केले.

शब्दगंध कविमंडळाच्या वतीने राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या सहकार्याने रविवारी (दि. २८) मराठी विद्यानिकेतनच्या सभागृहात आयोजित काव्यलेखन कार्यशाळेत ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी कविमंडळाचे अध्यक्ष प्रा. अशोक अलगोंडी होते.

कार्यशाळेचे उद्घाटन मराठी विद्यानिकेतन संस्थेचे अध्यक्ष सुभाष ओउळकर यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून करण्यात आले. प्रास्ताविक प्रा. अशोक अलगोंडी यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय बसवंत शहापूरकर यांनी करून दिला. उद्घाटनपर भाषण सुभाष ओउळकर यांनी केले.

मार्गदर्शन करताना अजय कांडर म्हणाले, “आतून उमटणारा हुंकार म्हणजे कविता. विचारांची बांधिलकी असेल तरच दर्जेदार कविता जन्माला येते. सातत्याने लेखन आणि स्वतःची चिकित्सा केल्याने कवी अधिक प्रगल्भ होतो. कवींनी स्वतःशी संवाद साधणे आवश्यक असून त्यातूनच अर्थपूर्ण कविता घडते. कवितेची समज वाढविण्यासाठी अशा कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरतात.”

यावेळी ज्येष्ठ कवी विजय चोरमारे यांनीही कवींना मार्गदर्शन केले. “कविता ही केवळ शब्दांची मांडणी नसून ती एक जबाबदारी आहे. चांगली कविता लयीत नव्हे, तर आशयात असते. कविता लिहिण्यासाठी प्रथम वाचन वाढविणे गरजेचे आहे. टाळ्यांच्या मोहापेक्षा कवितेतील विचार आणि मूल्यांना अधिक महत्त्व दिले पाहिजे,” असे ते म्हणाले.

कार्यशाळेत अजय कांडर यांची सुधाकर गावडे आणि उर्मिला शहा यांनी मुलाखत घेतली. यावेळी प्रा. सुभाष सुंठणकर, प्राचार्य आनंद मेणसे, किशोर काकडे, विलास बेळगावकर, लेखक विलास माळी, सत्यवान साटम, निशिगंधा गावकर, रेखा गद्रे, जितेंद्र रेडेकर, स्मिता किल्लेकर यांच्यासह अनेक कवी, साहित्यप्रेमी आणि अभ्यासक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुनाथ किरमटे यांनी केले, तर अस्मिता आळतेकर यांनी आभार मानले. कार्यशाळेला कवी आणि साहित्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

10 − six =

error: Content is protected !!