बेळगाव, ७ ऑगस्ट :
“पिरणवाडीसारख्या ग्रामीण भागातून येऊन विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे गोविंदराव राऊत हे एक समर्पित आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारे नेतृत्व होते. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल,” असे गौरवोद्गार आज मराठा मंदिर येथे आयोजित शोकसभेत विविध वक्त्यांनी काढले.
माजी महापौर, सार्वजनिक वाचनालयाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक गोविंदराव राऊत यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ही शोकसभा आयोजित करण्यात आली होती.
सभेच्या अध्यक्षस्थानी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष अनंत लाड होते. व्यासपीठावर नेताजी जाधव, मराठा मंदिराचे संचालक शिवाजी हंगेरगेकर, तसेच राऊत यांचे जावई पुनाजी पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात राऊत यांच्या प्रतिमेस अनंत लाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर विविध संस्था, संघटना आणि मान्यवरांनी पुष्पहार व फुले अर्पण करून आदरांजली वाहिली.
नेताजी जाधव यांनी प्रास्ताविक करताना राऊत यांच्याशी जोडलेल्या आठवणींना उजाळा दिला. माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी त्यांचे वर्णन “भगव्या ध्वजासाठी धाडसाने उभे राहणारे आणि सर्वांना एकत्र घेऊन चालणारे नेतृत्व” असे केले.
शोकसभेत टिळकवाडी वाचनालयातर्फे श्रीमती विजया पुजारी, पिरणवाडी ग्रामस्थांतर्फे नारायण पाटील, मराठा मंदिरातर्फे शिवाजीराव हंगेरगेकर, माजी नगरसेवकांतर्फे अनिल पाटील, महाराष्ट्र एकीकरण समिती युवा आघाडीतर्फे अंकुश केसरकर आणि मोतेश बारदेशकर आदींनी आपल्या भावना व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली.
प्रा. विनोद गायकवाड आणि अनंत लाड यांनी राऊत यांच्या सार्वजनिक वाचनालयातील योगदानाचा आढावा घेतला. अध्यक्षपदाची जबाबदारी आठ वेळा सांभाळलेल्या राऊत यांनी अनगोळ शाखेची स्थापना, संगीत भजन स्पर्धा आणि अनेक उपक्रमांच्या आयोजनात मोलाचा वाटा उचलला होता, असे त्यांनी सांगितले.
या शोकसभेस राऊत यांचे कुटुंबीय, नातेवाईक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे संचालन संयोजकांकडून करण्यात आले आणि शेवटी राऊत यांच्या कार्याला अभिवादन करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.