बेळगाव : गोकाक तालुक्यातील एका गावातील 13 वर्षांची मुलगी बालविवाहात अडकली होती. ही बाब लक्षात आल्यानंतर बालकल्याण समितीच्या अधिकाऱ्यांनी तिची सुटका केली. २५ जुलै रोजी तिला बेळगावातील महंतेश नगर येथील ‘सृष्टी गर्ल्स ओपन शेल्टर’ या बाल संरक्षण केंद्रात ठेवण्यात आले होते.
३० जुलै रोजी आरोपी चंद्रकांत लवगे या केंद्रात आला. त्याने स्वतःला मुलीचा मामा असल्याचे खोटे सांगून दरवाजा उघडून आत घुसला. त्याने तीला गोळ्या द्याव्या लागणार असल्याचा बनाव केला. नंतर त्याने चाकू दाखवून कर्मचाऱ्यांना धमकावले, मुलीला उचलले आणि मोटारसायकलवरून पळवून नेले.
या घटनेनंतर ३१ जुलै रोजी अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला, अशी माहिती महिला आणि बालविकास विभागाचे उपसंचालक एम. एन. चेतन कुमार यांनी दिली.
५ दिवसांनंतर पोलिसांनी मुलीची सुटका केली आणि आरोपीला अटक करण्यात आली.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शहर पोलिस आयुक्त भूषण बोरसे म्हणाले की, “ज्याच्यावर POCSO प्रकरणात गुन्हा दाखल आहे, त्याच आरोपीने मुलीचे अपहरण केले. सोमवारी आरोपी अटकेत आला आणि मुलीची सुटका करण्यात आली. अशा संरक्षण केंद्रांमध्ये मुख्यतः महिला कर्मचारी असतात. आरोपीने त्यांना धमकावून मुलीचे अपहरण केले. आता अशा केंद्रांमध्ये सुरक्षा दिली जाणार आहे.”
ही घटना अत्यंत धक्कादायक असून बालिकांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना करणे गरजेचे आहे.