खानापूर (प्रतिनिधी) | महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या शिष्टमंडळाने खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांची भेट घेऊन बेळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या कन्नड सक्तीविरोधात तीव्र संताप व्यक्त करत निवेदन सादर केले.
शुभम शेळके यांनी कन्नड सक्ती त्वरित मागे घेण्याची मागणी करत, आपण या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि तात्काळ पावले उचलावीत, असे निवेदन सादर केले. एका सार्वजनिक कार्यक्रमात झालेल्या या भेटीत कन्नड सक्तीमुळे मराठी भाषिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असल्याचे सांगण्यात आले.
कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी आमदारांना मागील निवेदनाची आठवण करून देताना खानापूर तालुक्यातील बसस्थानक, इस्पितळ व हेस्कॉम कार्यालयांवर केवळ कन्नड फलक लावण्यात आले असून मराठीचा पूर्णतः बळी जात असल्याची गंभीर बाब निदर्शनास आणून दिली.
मराठी भाषिक अल्पसंख्याकांना घटनात्मक अधिकार असूनही त्यांची पायमल्ली होत असल्याचे ठळकपणे नमूद करत, ही बाब मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांच्या निदर्शनास आणून द्यावी, असेही आग्रहाने सांगण्यात आले. “आपण एक मराठी भाषिकांचे प्रतिनिधी म्हणून मराठी जनतेच्या भावनांचे प्रतिनिधित्व करावे,” असा ठाम आग्रह समितीने व्यक्त केला.
यावर आमदार विठ्ठल हलगेकर यांनी सकारात्मक भूमिका घेत, “मी स्वतः मराठी भाषिकांच्या मतांमुळे निवडून आलो आहे. त्यामुळे कन्नड सक्ती थांबली पाहिजे, ही माझी स्पष्ट भूमिका आहे. मराठीचा अभिमान जपणाऱ्यांच्या मागे मी ठामपणे उभा आहे. लवकरच जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून योग्य ती कारवाई करण्याची विनंती करीन,” असे ठाम आश्वासन दिले.
या भेटीत समितीचे सरचिटणीस मनोहर हुंदरे, महादेव पाटील, शिवाजी हावळाण्णाचे, पिराजी मुंचडीकर, चंद्रकांत पाटील, नारायण मुंचडीकर, रमेश माळवी, सचिन गोरले (शिवसेना तालुकाप्रमुख), जोतिबा येळ्ळूरकर, अशोक डोळेकर, प्रतिक गुरव, अशोक घगवे, महेंद्र जाधव, विजय जाधव, सुरुज जाधव, राजू पाटील, प्रविण पाटील, उमेश पाटील, निलेश काकतकर, साईराज कुगजी, ज्ञानेश्वर चिकोर्डे, प्रशांत बैलूरकर, अभिषेक कारेकर, शुभम जाधव, रोशन पाटील, श्रीकांत नादूंरकर, शंकर पाखरे, शुभम पाटील, भरत पाटील, किरण पाटील, विनायक सुतार, प्रसाद पाटील, भरमाणी पाखरे, राजु पावले, रामलिंग चोपडे, जोतिबा चोपडे, वैभव पाटील, ओमकार पाखरे, संजय पाटील, मल्लाप्पा मदार, सागर कणबरकर, विनायक हुलजी, सुर्याजी पाटील, प्रतिक देसाई, बळीराम पाटील आदींसह मोठ्या संख्येने मराठी भाषिक उपस्थित होते.
मराठी भाषेच्या सन्मानासाठी आणि सीमाभागातील भाषिक हक्कांसाठी हा लढा अधिक तीव्रतेने लढण्याचा निर्धार यावेळी सर्वांनी केला.