बेळगाव |
महापालिकेने बेळगावच्या उद्यमबाग परिसरात व्यावसायिक नामफलकांवर कन्नड भाषेचा वापर सक्तीने करण्यासाठी मोहीम राबवली. मात्र, या मोहिमेदरम्यान महापालिका कर्मचाऱ्यांसोबत काही स्थानिक संघटनांशी संबंधित गुंड प्रवृत्तीचे लोकही सहभागी असल्याचे चित्र समोर आले आहे.
संबंधित मोहिमेत हे लोक दुकानदारांवर “कन्नड फलक लावा, अन्यथा येथे व्यवसाय करू नका” अशा स्वरूपाची दमदाटी करत असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे ही धमकी महापालिका कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीतच दिली जात होती, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.
दुकानदारांवर अशा प्रकारे दबाव आणणे आणि गुंडांच्या मदतीने प्रशासनाकडून सक्ती करणे ही लोकशाहीच्या मूल्यांना धक्का देणारी बाब असल्याचे नागरिकांनी सांगितले. सरकारी मोहिमेत गुंडांना स्थान कसे? असा सवाल करत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
या प्रकरणावरून आता महापालिका व पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कोणती कारवाई केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
न्याय्य मार्गाने दुकान चालवणाऱ्या व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही यातून उपस्थित झाला असून, प्रशासनाने याची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे, अशी नागरिकांची मागणी आहे.