व्यस्त जीवनात हास्य-विनोदाचे महत्त्व जपा : डॉ. विनोद गायकवाड

व्यस्त जीवनात हास्य-विनोदाचे महत्त्व जपा : डॉ. विनोद गायकवाड

बेळगाव : हास्य-विनोदाला जीवनात महत्त्वाचे स्थान असून प्रत्येकाने नेहमी हसतमुख राहावे, असा सल्ला ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विनोद गायकवाड यांनी दिला. बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्याकिरण सेवा केंद्रामार्फत आयोजित ज्ञान व मनोरंजन कार्यक्रमात ते ‘व्यस्त जीवन आणि रंजन’ या विषयावर बोलत होते.

टिळकवाडी येथील डॉ. निता देशपांडे डायबेटिस सेंटर येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वास धुराजी होते. यावेळी कार्यवाह सुरेंद्र देसाई व सहकार्यवाह शिवराज पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉ. गायकवाड म्हणाले की, वय हा केवळ एक आकडा असून त्याकडे गांभीर्याने न पाहता जीवनाचा आनंद घ्यावा. नव्वदीनंतरच खऱ्या अर्थाने म्हातारपण येते, असे सांगत त्यांनी उपस्थितांना सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याचे आवाहन केले. तसेच, कोणी सल्ला विचारल्यासच सल्ला द्यावा, असा कानमंत्रही त्यांनी दिला.

कार्यक्रमात अश्विनी पाटील, डॉ. श्रेयश चौगुले, रविंद्रनाथ जुवळी, जगमोहन अगरवाल, योगिनी देसाई, सुरेंद्र देसाई आणि अशोक कदम यांनी हिंदी, मराठी व कन्नड गीते सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले. विजय बांदिवडेकर यांनी शास्त्रीय गीत तर चंद्रशेखर गायकवाड यांनी कविता सादर केली. वनिता जोशी यांनी अधिक मासाचे महत्त्व विशद केले.

प्रारंभी पांडुरंग कारकल यांनी प्रार्थना सादर केली. सुरेंद्र देसाई यांनी प्रास्ताविक केले, तर शिवराज पाटील यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. कार्यक्रमाच्या शेवटी मीना कुलकर्णी यांनी आभार मानले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

17 + twelve =

error: Content is protected !!