मणगुत्ती (ता. हुक्केरी) येथील शिवपुतळा उभारणीप्रकरणी दाखल गुन्ह्याच्या सुनावणीची प्रक्रिया सध्या संकेश्वर सत्र न्यायालयात सुरू असून, आज दिनांक ३१ जुलै रोजी झालेली सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या १२ ऑगस्ट रोजी होणार आहे.
या खटल्यात महाराष्ट्रातील मराठा नेते दिनेश कदम यांच्यावर यमकनमर्डी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मणगुत्ती येथे शिवप्रेमींनी शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची मागणी केली होती. त्यावेळी पुतळ्याची विटंबना झाल्याने शिवप्रेमींचा संताप उफाळून आला होता. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी चौथऱ्याजवळ जाण्यास मज्जाव केला होता. याच पार्श्वभूमीवर काही व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
आज झालेल्या सुनावणी दरम्यान दिनेश कदम तसेच युवा समिती सीमाभागाचे अध्यक्ष शुभम शेळके न्यायालयात हजर होते. या प्रकरणात वकील महेश बिर्जे आणि वकील रिचमन रिकी यांच्याकडे बचाव पक्षाची जबाबदारी आहे.
सीमाभागातील अस्मिता व शिवप्रेमाशी संबंधित असलेल्या या प्रकरणाकडे मराठी जनतेचे लक्ष लागले असून, पुढील सुनावणीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.