बेळगाव : सीमाप्रश्न अंतिम टप्प्यात असतानाही महाराष्ट्र सरकारकडून होत असलेल्या दुर्लक्षाविरोधात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती आक्रमक झाली असून, येत्या १५ दिवसांत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा समितीने दिला आहे. हा निर्णय बेळगावातील मराठा मंदिर येथे झालेल्या समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत घेण्यात आला.
बैठकीत सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात तसेच कन्नड संघटनांच्या वाढत्या कुरघोड्यांविरोधात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी बैठकीतील चर्चेची माहिती दिली.
येत्या १ जून रोजी होणाऱ्या हुतात्मा दिन कार्यक्रमाच्या नियोजनाबरोबरच सीमाभागात जाणीवपूर्वक उकरून काढल्या जाणाऱ्या भाषावादाचा तीव्र निषेध करण्यात आला. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून, ३० मेपर्यंत सर्व घटक समित्यांच्या बैठका घेऊन आंदोलनाची अंतिम तारीख निश्चित करण्यात येणार आहे.
गेल्या दोन वर्षांत तज्ज्ञ समिती आणि उच्चाधिकार समितीची एकही बैठक न झाल्याने बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. सीमावासीयांना भेटीसाठी वेळ न दिल्याबद्दल महाराष्ट्र सरकारवर टीका करत मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.
भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालाचा संदर्भ देत बेळगावमध्ये २० टक्क्यांहून अधिक मराठी भाषिक असल्याने सर्व सरकारी परिपत्रके मराठीत देण्याची मागणी करण्यात आली. आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करून आगामी लोकसभा अधिवेशनात सीमाभागातील मराठी भाषिकांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारवर दबाव वाढवण्याचे ठरवण्यात आले.
कन्नड संघटनांच्या कुरघोड्यांना कर्नाटक सरकारकडून खतपाणी घातले जात असल्याचा आरोप करत, आधी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाईल आणि त्यानंतरही परिस्थिती बदलली नाही तर महाराष्ट्र एकीकरण समिती आपल्या पद्धतीने आंदोलन उभे करेल, असा इशारा प्रकाश मरगाळे यांनी दिला.
महानगरपालिकेत सीमाप्रश्नाविरोधी ठराव मांडण्याच्या हालचालींवर कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. आंदोलन उभारण्यापूर्वी कार्यकर्त्यांना विश्वासात घेणे आवश्यक असून, सर्व घटक समित्यांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेतले जातील, असे स्पष्टीकरण माजी महापौर मालोजीराव अष्टेकर यांनी दिले.
या बैठकीला मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, माजी आमदार मनोहर किणेकर, शहर समितीचे कार्याध्यक्ष रणजित चव्हाण-पाटील, सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, खानापूर समितीचे गोपाळराव पाटील, अमर येळ्ळूरकर, लक्ष्मण होनगेकर, बी. डी. मोहनगेकर, आर. C. मोदगेकर, एम. जी. पाटील, एम. बी. गुरव, लक्ष्मण पाटील आणि अजित पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
