बेळगाव | सीमाभागात कर्नाटक सरकारने सरकारी कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी फक्त कन्नड भाषेतील नामफलक लावण्याचे आदेश दिले असून, यामुळे मराठी भाषिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. मराठी व इंग्रजी भाषेतील नामफलक हटवून त्यांच्या जागी फक्त कन्नड फलक लावले जात आहेत, तसेच सरकारी कामकाज फक्त कन्नड भाषेत करण्याचे आदेशही अंमलात आणले जात आहेत.
हा वादग्रस्त सीमाभाग सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना, येथे भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या शिफारशींचा देखील भंग केला जात आहे. आयोगाने स्पष्ट निर्देश दिले होते की कन्नडबरोबर मराठी भाषेतही फलक लावावेत व परिपत्रके प्रसिद्ध करावीत, परंतु याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.
या भाषिक अन्यायाविरोधात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने आवाज उठवला असून, शुक्रवार, दिनांक २५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर आणि सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी सर्व सभासद, घटक समित्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मराठी भाषिक नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
🛑 “हा लढा केवळ फलकांचा नाही, तर मराठी अस्मितेच्या अस्तित्वासाठीचा आहे,” असे मत मराठी भाषिकांनी व्यक्त केले आहे.—
#मराठीअस्मिता #सीमाभागसंघर्ष #मराठीविरोधातअन्याय #Belgaum #महाराष्ट्रएकीकरण