बेळगाव, २३ जुलै — मार्कंडेय नगर मच्छे येथील उच्च प्राथमिक सरकारी मराठी शाळेत मंगळवारी मध्यान्ह आहारानंतर ३५ हून अधिक विद्यार्थी विषबाधेमुळे अत्यवस्थ झाले आहेत. दुपारच्या सुमारास जेवण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना पोटदुखी, उलटी, डोकेदुखी यासारख्या त्रासांची तक्रार होऊ लागली. संध्याकाळपर्यंत तब्बल ३५ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सिव्हिल हॉस्पिटलसह विविध खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.शाळेत दररोजप्रमाणे मध्यान्ह भोजन देण्यात आले होते, मात्र विद्यार्थ्यांनी जेवणात पाल आढळल्याची तक्रार केली. त्यानंतर काही वेळातच अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली. प्रथम आठ विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, त्यानंतर टप्प्याटप्प्याने आणखी विद्यार्थी अस्वस्थ होत गेल्याने एकूण रुग्णसंख्या वाढत गेली.घटनेची माहिती मिळताच विद्यार्थ्यांचे पालक शाळा आणि रुग्णालयात मोठ्या प्रमाणात जमा झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आय.पी. गडाद, जिल्हा शिक्षणाधिकारी लिलावती हिरेमठ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश दंडगी, तसेच बेळगाव ग्रामीण पोलीस निरीक्षक एन. आय. कट्टीमनीगौडा व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.उपलब्ध माहितीनुसार ३५ पेक्षा अधिक विद्यार्थी विषबाधेने बाधित झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. सुदैवाने सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. या घटनेनंतर शाळेतील अन्नवाटपाची प्रक्रिया, पुरवठादार आणि स्वयंपाक गृहाची तपासणी सुरू करण्यात आली आहे.या प्रकारामुळे शाळेतील अन्न सुरक्षेच्या उपाययोजनांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत आणि दोषींवर कारवाईची मागणी आता जोर धरत आहे.
मार्कंडेनगर मच्छे शाळेत मध्यान्ह आहारातून विषबाधा: ३५ हून अधिक विद्यार्थी अत्यवस्थ
