वॉर्ड क्र. ४१ मध्ये ड्रेनेजचा गंभीर प्रश्न; दूषित पाणी रस्त्यावर, नागरिक त्रस्त

वॉर्ड क्र. ४१ मध्ये ड्रेनेजचा गंभीर प्रश्न; दूषित पाणी रस्त्यावर, नागरिक त्रस्त

बेळगाव : शहरातील वॉर्ड क्रमांक ४१ अंतर्गत महालक्ष्मी कॉलनी, आदर्श नगर परिसरात ड्रेनेज लाईन ब्लॉक झाल्याने चेंबरमधून दूषित पाणी ओव्हरफ्लो होण्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे ही समस्या गेल्या वर्षभरापासून कायम असून वारंवार तक्रारी करूनही महापालिकेकडून कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.

सदर ड्रेनेज लाईन तुंबल्यामुळे गटारींमध्ये दूषित पाणी साचले असून ते थेट रस्त्यावरही वाहत आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. इतकेच नव्हे तर जवळच असलेल्या रिकाम्या जागेत या पाण्यामुळे तलावासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

या गंभीर समस्येमुळे परिसरातील अनेक विहिरी दूषित झाल्या असून त्या पाण्यासाठी वापरण्यायोग्य राहिलेल्या नाहीत. ऐन उन्हाळ्यातच पाण्याची टंचाई भासत असताना दूषित पाण्यामुळे नागरिकांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढली असून रोगराई पसरण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

नागरिकांनी इशारा दिला आहे की, जर उन्हाळ्यातच ही परिस्थिती इतकी गंभीर असेल तर पावसाळ्यात आणखी बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने तातडीने लक्ष घालून या समस्येवर ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी जोरदार मागणी परिसरातील रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

#Belgav #BedhadakBelgav

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eighteen − fifteen =

error: Content is protected !!