📍खानापूर | प्रतिनिधी : मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी समजून घेत प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य रमेश धबाले यांनी केले.चापगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील विविध गावांतील सरकारी मराठी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना धबाले यांनी, “मराठी शाळा आणि संस्कृती टिकविण्यासाठी युवा समिती सातत्याने प्रयत्नशील आहे आणि त्यांचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे,” असे गौरवोद्गार काढले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस.डी.एम.सी. अध्यक्ष मष्णू चोपडे होते. तसेच एस.डी.एम.सी. सदस्य अभिजीत पाटील, प्रभू कदम, परसू कदम आदी मान्यवर उपस्थित होते.शाळेचे मुख्याध्यापक महेश कवळेकर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून आभार मानले.कार्यक्रमांतर्गत शिवोली व कारलगा येथील सरकारी मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालक वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मराठी शाळांचे जतन ही आपली जबाबदारी – रमेश धबाले यांचे प्रतिपादन
