बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची मोठी संधी उपलब्ध करून देत शिवाजी विद्यापीठाने फी सवलत योजना जाहीर केली आहे. सन 2022-23 या शैक्षणिक वर्षापासून लागू झालेल्या या योजनेअंतर्गत सीमा भागातील एकूण 865 गावांतील विद्यार्थ्यांना लाभ मिळत असून यावर्षीही (2026-27) प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
या योजनेनुसार अनुदानित (Grant-in-aid) अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांची संपूर्ण ट्युशन फी माफ करण्यात आली आहे. तर विनाअनुदानित (Non-grant) अभ्यासक्रमांसाठी 25 टक्के ट्युशन फी सवलत देण्यात येत आहे. तसेच जे विद्यार्थी विद्यापीठाच्या वसतिगृहात प्रवेश घेऊ इच्छितात, त्यांच्यासाठी वसतिगृह शुल्क पूर्णतः माफ करण्यात आले असून ही सुविधा सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी विशेष लाभदायी ठरत आहे.
शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू असून ज्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा आवश्यक आहे, त्या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा दिनांक 12 मे ते 15 मे 2026 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत. तर ज्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा नाही, अशा अभ्यासक्रमांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 27 एप्रिल 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेविषयी अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.unishivaji.ac.in/mscadmission/forstudentinformation) भेट देऊन आवश्यक तपशील भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, सीमा भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व माहिती देण्यासाठी लवकरच बेळगाव येथे विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया, अभ्यासक्रम निवड व सवलतींचा लाभ घेण्यास मदत होणार आहे.
या संधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, कार्याध्यक्ष मनोहर किनेकर व सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर यांनी केले आहे.
