दोड्डण्णवर हायस्कूलमध्ये 19 वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांचे ‘गुरुवंदना’ व ‘स्नेहमिलन’ उत्साहात संपन्न

दोड्डण्णवर हायस्कूलमध्ये 19 वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांचे ‘गुरुवंदना’ व ‘स्नेहमिलन’ उत्साहात संपन्न

बेळगाव: हालगा येथील श्रीमती जे. आर. दोड्डण्णवर हायस्कूलमध्ये 2006-07 या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थ्यांच्या वतीने आयोजित ‘गुरुवंदना’ व ‘स्नेहमिलन’ कार्यक्रम उत्साहात आणि आनंदात पार पडला. तब्बल 19 वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाला दिशा देणाऱ्या गुरुजनांचा सन्मान करत शालेय आठवणींना उजाळा दिला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित निवृत्त व विद्यमान शिक्षकांचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. त्यानंतर शालेय जीवनाची आठवण म्हणून प्रार्थना, नाडगीत व राष्ट्रगीत सादर करून पुन्हा एकदा शाळेचे वातावरण निर्माण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भरतेंश शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्रीपाल खेमलापुरे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव विनोद दोड्डण्णवर उपस्थित होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचे त्यांनी आपल्या भाषणात कौतुक केले.

या प्रसंगी 20 हून अधिक शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा त्यांच्या सेवेसाठी भव्य सत्कार करण्यात आला. निवृत्त मुख्याध्यापक बी. एच. बिळगोजी, टी. पी. चौगुले, ए. बी. सनदी यांच्यासह अनंत लाड, विद्यमान मुख्याध्यापिका नलिनी आगरे-पाटील आणि इतर जेष्ठ शिक्षकांनी मनोगत व्यक्त करताना जुन्या आठवणींना उजाळा दिला.

त्याच बॅचमधील गोपीनाथ परंडे, संतोष लोहार, शंकर जंगली, मारुती जंगली आणि अभिनंदन गंडिगवाड हे भारतीय सैन्यात, तसेच संजय कोलकार व सागर मुचंडी हे पोलिस खात्यात कार्यरत असल्याने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान माजी विद्यार्थ्यांनी शाळेस देणगी अर्पण केली तसेच स्मरणार्थ 10 कुशन चेअर्स व क्रीडा साहित्य भेट दिले. लहान मुलांकडून सादर करण्यात आलेल्या भरतनाट्यम नृत्याने कार्यक्रमाची शोभा वाढवली. दुपारनंतर शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी आयोजित मनोरंजक खेळांनी सर्वांना पुन्हा बालपणाच्या आठवणीत रमवले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिषेक देसाई यांनी केले. सूत्रसंचालन तेजा हुडेद व पद्मजा पाटील यांनी केले, तर प्रियांका थोरली यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पवनकुमार, भरतेंश, भावकन्ना, नागराज, महावीर कमाल, अक्षय पाटील, गोपीनाथ व संतोष यांनी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी संस्थेचे संचालक धीरज दोड्डण्णवर, बाहुबली कडेमणी, महावीर बेल्लद, अशोक बेल्लद यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

twelve + three =

error: Content is protected !!