बेळगाव:
डिजिटल युगात वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पोलीस आयुक्त श्री. भूषण गुलाबराव बोरसे (IPS) यांनी केले. कोणत्याही आमिषाला किंवा भीतीला बळी न पडता विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घेतल्यास आर्थिक फसवणूक टाळता येते, असे त्यांनी स्पष्ट केले.
शनिवार, २८ मार्च रोजी टिळकवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील श्री सामर्थ्य मंदिर हॉल येथे ‘बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ’ आणि ‘बेळगाव शहर सायबर क्राईम विभाग’ यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर क्राईम जनजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस आयुक्त बोरसे यांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले.
पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे त्यांनी ओटीपी फ्रॉड, ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवणारे प्रकार, लॉटरी स्कॅम तसेच बनावट केवायसी अपडेट्स यांसारख्या फसवणुकीच्या पद्धती सोप्या भाषेत समजावून सांगितल्या. संशयास्पद लिंकवर क्लिक न करणे, अनोळखी कॉलवर वैयक्तिक माहिती न देणे यांसारख्या महत्त्वाच्या सूचनाही त्यांनी दिल्या. पीएसआय सुमन पवार यांनीही तांत्रिक सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात मानद सचिव श्री. सुरेंद्र देसाई यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. एसीपी (सायबर क्राईम) श्री. मंतूर यांनी प्रास्ताविक केले. संघाचे अध्यक्ष श्री. विश्वास धुराजी यांनी पोलीस आयुक्तांसह उपस्थित अधिकाऱ्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. ‘मीडिया पॉवर प्रेस’चे मालक श्री. संदीप देसाई यांनीही विशेष सन्मान केला.
मुख्य वक्ते म्हणून वरिष्ठ पत्रकार श्री. प्रसाद प्रभू यांनी सायबर गुन्ह्यांची सद्यस्थिती आणि घ्यावयाच्या खबरदारीबाबत प्रभावी मार्गदर्शन केले. यावेळी एसीपी मंतूर, सायबर क्राईम पोलीस निरीक्षक श्रीशैल गाबी तसेच टिळकवाडी पोलीस निरीक्षक परशुराम पुजारी यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे नियोजन पीआरओ श्री. विकास कलघटगी यांनी केले. शेवटी ज्येष्ठ नागरिकांनी सायबर सुरक्षा आणि मोबाईल बँकिंग संदर्भात विविध प्रश्न विचारले. पोलीस आयुक्तांनी सर्व शंकांचे समाधानकारक निरसन केले. मानद सहसचिव श्री. शिवराज पाटील यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. चहा व अल्पोपहारानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
