बेळगाव : देशातील मान्यवर साहित्य संस्थांपैकी एक असलेल्या साहित्य अकादमी तर्फे नवी दिल्ली येथे आयोजित “फेस्टिवल ऑफ लेटर्स 2026” या वार्षिक साहित्य महोत्सवासाठी बेळगावचे ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. विनोद गायकवाड यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
या महोत्सवात “21व्या शतकात दलित साहित्य” या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून, त्यामध्ये आपले विचार मांडण्यासाठी डॉ. गायकवाड यांना विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. 30 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत होणाऱ्या या साहित्य महोत्सवात सुमारे 100 विविध विषयांवरील परिसंवादांचे आयोजन करण्यात आले असून देश-विदेशातील 700 हून अधिक साहित्यिक व विचारवंत सहभागी होणार आहेत. “दलित साहित्य” विषयावरील परिसंवाद 1 एप्रिल रोजी पार पडणार आहे.
डॉ. विनोद गायकवाड यांनी कथा, कादंबरी, नाटक, समीक्षा आणि संशोधन या विविध साहित्यप्रकारांत भरीव योगदान दिले आहे. त्यांच्या ‘साई’, ‘युगांत’, ‘युगारंभ’ यांसारख्या कादंबऱ्या मराठीतून हिंदी, इंग्रजी, कन्नड, तमिळ, कोकणी आणि गुजराती अशा अनेक भाषांमध्ये भाषांतरित झाल्या असून त्यांना विविध पुरस्कारांनीही गौरविण्यात आले आहे.
भारत सरकारचे संस्कृतिक मंत्रालय यांच्या सचिव पल्लवी होळकर यांनी पत्राद्वारे ही माहिती कळविली आहे. साहित्य अकादमीकडून डॉ. गायकवाड यांच्या साहित्याची देशपातळीवर घेतलेली दखल हा बेळगावसाठी अभिमानाचा क्षण असून, या निवडीमुळे सीमाभागातील साहित्यविश्वात आनंदाची लहर निर्माण झाली आहे.
