कन्नड सक्तीला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती मैदानात; पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची घेतली जाणार भेट
बेळगाव | प्रतिनिधी
कर्नाटक सरकारच्या कन्नड प्राधिकरणाच्या बैठकीत सर्व सरकारी ठिकाणी 100 टक्के कन्नड सक्तीचा निर्णय घेतल्याने सीमाभागात संतापाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग यांच्या वतीने यास तीव्र विरोध करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत निर्णय घेण्यात आला की, कन्नड सक्तीचा निषेध करण्यासाठी आणि सरकारी कार्यालयांमध्ये मराठी भाषेला देखील सन्मान मिळावा यासाठी लोकप्रतिनिधींना भेट देण्यात यावी. त्याअंतर्गत रविवार, दिनांक 20 जुलै रोजी बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. सतीश जारकीहोळी यांची भेट घेण्यात येणार आहे.
या भेटीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, बेळगाव येथून दुपारी 2.30 वाजता गोकाककडे प्रयाण करण्यात येणार असून, मराठी भाषिक नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी इच्छुकांनी युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मराठी भाषिकांवर अन्याय सहन केला जाणार नाही – अशा निर्धाराने युवा समितीने हा लढा उभारला आहे. सरकारी ठिकाणी मराठी भाषेचा वापर सुनिश्चित होण्यासाठी व कन्नड सक्ती थांबवण्यासाठी हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.