बेळगाव : मराठा सहकारी बँकेत सुरू असलेल्या नोकर भरती प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत कृतिशील मराठा समाज आणि बँक हितचिंतकांची महत्त्वपूर्ण बैठक आज श्री जत्तीमठ देवस्थान येथे पार पडली. या बैठकीत २२ जागांच्या भरती प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा आरोप करण्यात आला.
बैठकीदरम्यान उपस्थितांनी बँक प्रशासनावर टीका करत भरती प्रक्रिया संशयास्पद पद्धतीने राबवण्यात आल्याचा आरोप केला. भरतीसंदर्भातील जाहिरात बेळगावातील प्रमुख माध्यमांतून प्रसिद्ध का करण्यात आली नाही, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. सोशल मीडिया आणि मराठी वृत्तपत्रांमधून जाहिरात दिली असती, तर हजारो बेरोजगार मराठा तरुणांना संधी मिळाली असती, असे मत व्यक्त करण्यात आले.
यावेळी दत्ता जाधव यांनी बँक प्रशासनाने जाणीवपूर्वक जाहिरात न दिल्याची शक्यता व्यक्त करत भरती प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला. उमेदवारांकडून नाममात्र शुल्क घेतले असते, तरी बँकेला आर्थिक फायदा झाला असता, मात्र व्यवस्थापनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे त्यांनी नमूद केले. यासंदर्भात बँकेच्या जनरल मॅनेजर व प्रशासनाला सविस्तर निवेदन देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, पुढील रणनीती ठरवण्यासाठी लवकरच आणखी एक बैठक घेण्यात येणार असल्याचे कृतिशील मराठा समाजाचे समन्वयक अमित देसाई यांनी सांगितले. भरती प्रक्रिया पारदर्शक न झाल्यास उपोषणाचा इशाराही त्यांनी दिला.
या बैठकीला अमित देसाई, दत्ता जाधव, सुनील बाळेकुंद्री, सूर्यकांत शिंदे, किरण हुद्दार, चंद्रकांत कोंडुसकर, शेखर पाटील, श्रीधर खन्नूकर, नारायण अष्टेकर, संतोष कृष्णाचे, सुरज गवळी, सुरज कुडूचकर, सुनील बोकडे, विक्रमसिंह कदम-पाटील, राजू बिरजे, मोतेश बारदेशकर, विक्रांत मोहनगेकर, सुरेश अगसगेकर, बळवंत शिंदोळकर, श्रीकांत कदम, अंकुश केसरकर, विजय भोसले, मनोहर हलगेकर, वाय. एम. शहापूरकर यांच्यासह मराठा समाजातील मोठ्या संख्येने बांधव उपस्थित होते.
