बेळगाव : चलवेनहट्टी येथील गुड्डादेवी मंदिर परिसरात अज्ञात व्यक्तींनी मध्यरात्रीच्या सुमारास शेतातील झोपडीला आग लावल्याची घटना घडली असून या आगीत मोठे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चलवेनहट्टी येथील शेतकरी चंद्रकांत आलगोंडी यांच्या शेतातील झोपडीला अज्ञाताकडून आग लावण्यात आली. सदर झोपडीचा वापर शेतीची औजारे व इतर साहित्य ठेवण्यासाठी केला जात होता. आगीमुळे झोपडीसह त्यामधील शेतीविषयक साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले.
या आगीचा फैलाव झाल्याने आजूबाजूच्या शेतांमधील काजूच्या झाडांनाही मोठा फटका बसला असून अनेक काजूची झाडे तसेच लहान रोपे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
गुड्डादेवी मंदिर परिसरात काजूच्या बागा मोठ्या प्रमाणात असून बाहेरील काही युवकांकडून येथे वारंवार मांसाहारी पार्ट्यांचे आयोजन केले जाते. या पार्ट्यांमध्ये दारू पिणे, भांडणे करणे, काचांच्या बाटल्या फोडणे तसेच सिगारेट ओढून थोटके कुठेही फेकणे असे प्रकार होत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. नशेत असलेल्या युवकांकडून सिगारेटचे थोटके फेकल्यामुळे आग लागण्याच्या घटना घडत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या प्रकारामुळे परिसरातील शेतकरी त्रस्त झाले असून अशा हुल्लडबाज युवकांवर कारवाई करावी तसेच या भागात पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी चलवेनहट्टी, अगसगे, अतिवाड व बेकीनकेरी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
