बेळगाव जिल्ह्यातील कलखांब गावचे सुपुत्र राहुल पाटील यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत २२४ वा क्रमांक मिळवला आहे. त्यांच्या या घवघवीत यशामुळे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) मध्ये निवड होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
राहुल पाटील यांनी यापूर्वीही प्रशासकीय सेवांच्या स्पर्धा परीक्षेत यश मिळवले होते. मागील वर्षी झालेल्या UPSC परीक्षेत त्यांना ८०० पेक्षा अधिक क्रमांक मिळाला होता. त्या आधारे त्यांची भारतीय वन सेवा (IFS) मध्ये निवड झाली होती. सध्या ते देहराडून येथील इंदिरा गांधी नॅशनल फॉरेस्ट अकॅडमी येथे प्रशिक्षण घेत आहेत.
मात्र मागील निकालावर समाधान न मानता त्यांनी पुन्हा UPSC परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. अधिक चांगला क्रमांक मिळवण्यासाठी त्यांनी अभ्यासाची जिद्द कायम ठेवत पुन्हा परीक्षा दिली आणि यंदाच्या निकालात २२४ वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली.
राहुल पाटील यांच्या या यशामुळे त्यांच्या कुटुंबीयांसह कलखांब गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या मेहनत, जिद्द आणि चिकाटीमुळे मिळवलेल्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
