बोडकेनट्टी : सीमाभागातील बेळगाव जिल्ह्यातील गिरणी कामगारांच्या प्रलंबित घरांच्या प्रश्नासाठी १० मार्च २०२६ रोजी मुंबई येथे ‘चला आझाद मैदान’ आंदोलन पुकारण्यात आले असून, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शनिवार दि. ७ मार्च रोजी दुपारी १२ वाजता बोडकेनट्टी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील काळामा देवी मंदिरात गिरणी कामगारांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.
एकेकाळी मुंबईत कापड गिरण्या मोठ्या प्रमाणात सुरू होत्या आणि त्यामध्ये सीमाभागातील, विशेषतः बेळगाव जिल्ह्यातील कामगारांची संख्या लक्षणीय होती. या कामगारांनी मुंबईच्या औद्योगिक व आर्थिक विकासात मोठे योगदान दिले. मात्र १९९० साली महाराष्ट्र शासन व मुंबई महापालिकेने गिरण्यांच्या जागेचा वाणिज्य व निवासी वापरासाठी निर्णय घेतल्यानंतर गिरणी मालकांना मोठा आर्थिक फायदा झाला; परंतु हजारो गिरणी कामगार व त्यांच्या कुटुंबीयांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली.
श्रमिक संघटनेच्या माध्यमातून गिरणी कामगारांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला. त्यानंतर शासनाने गिरणी कामगारांना किंवा त्यांच्या वारसांना घरे देण्याचा निर्णय जाहीर केला; मात्र या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी आजतागायत झालेली नाही. त्यामुळे गिरणी कामगारांना किंवा त्यांच्या वारसांना मुंबईतच मोफत घरे मिळावीत, या मागणीसाठी १० मार्च २०२६ रोजी आझाद मैदान येथे आंदोलन छेडण्यात येणार आहे.
शनिवारच्या बैठकीत श्रमिक संघटनेचे कॉम्रेड उदय भट, कॉम्रेड दत्तात्रय आत्याळकर व कॉम्रेड अतुल दिघे मार्गदर्शन करणार आहेत. चलवेनहट्टी, बोडकेनहट्टी, हंदिगनूर, अगसगे, अतिवाड, कुरीहाळ, कट्टनभावी, म्हाळेनहट्टी, मण्णीकीरे, बेक्कीनकेरे, किटवाड, बंबरगा, केदनूर आदी भागातील गिरणी कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मनोहर हुंदरे (चलवेनहट्टी), राजू तवनोजी (बोडकेनहट्टी), बाळू पाटील (हंदिगनूर), जोतिबा पाटील (चलवेनहट्टी) व केदारी पाटील (अतिवाड) यांनी केले आहे.
गिरणी कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी या बैठकीकडे व आगामी आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
#Belgav #BedhadakBelgav
