मुंबई : महाराष्ट्राच्या अधिवेशनात राज्यपालांच्या भाषणात केवळ सीमा प्रश्नाचा उल्लेख होतो, मात्र त्यापलीकडे ठोस कारवाई होताना दिसत नाही, अशी टीका माजी मंत्री व विद्यमान आमदार जयंत पाटील यांनी केली.महाराष्ट्र विधानसभेत बोलताना त्यांनी मुख्यमंत्री यांनी हा प्रश्न मनावर घेऊन लवकरात लवकर निकालासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली.
मुख्यमंत्र्यांना कायद्याचे उत्तम ज्ञान असून त्यांनी आपल्या ओळखीचा व अनुभवाचा उपयोग करून हा खटला सर्वोच्च न्यायालयाच्या पटलावर तातडीने आणावा व जलदगतीने सुनावणी व्हावी यासाठी प्रयत्न करावेत, असे पाटील यांनी सांगितले. सीमा भागातील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच महाराष्ट्राच्या राजकारणात दोन पक्ष फुटल्यानंतर न्यायालयीन कसोटीवर ते खरे ठरवण्यात मुख्यमंत्र्यांनी मोठी भूमिका बजावली, असा टोला लगावत त्यांनी सीमा प्रश्नही त्याच तत्परतेने सोडवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
सीमा प्रश्न हा राज्याच्या अस्मितेशी संबंधित असून तो अधिक काळ प्रलंबित ठेवू नये, अशी मागणी करत पाटील यांनी सरकारने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, असे आवाहन केले.

