बेळगाव : सीटीएस क्रमांक २११, शुक्रवार पेठ, टिळकवाडी येथील मालमत्ता ही आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) यांचीच असल्याने त्या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या चार कुटुंबांना न्यायालयीन प्रक्रियेनंतर बेलिफामार्फत नियमानुसार बाहेर काढण्यात आले असून या कारवाईत कोणतीही नियमबाह्य बाब घडलेली नाही, असे स्पष्टीकरण इस्कॉनच्या वतीने देण्यात आले आहे. या संदर्भातील निवेदन गुरुवारी बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना देण्यात आले.
इस्कॉनकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, संबंधित जागा २००३ साली नोंदणीकृत निरंतर पट्ट्याने घेण्यात आली होती. त्या वेळी त्या परिसरात एकूण १४ कुटुंबे वास्तव्यास होती. सर्व कुटुंबांना जागा सोडण्याची विनंती करण्यात आली होती आणि पर्यायी जागा घेण्यासाठी व घरे बांधण्यासाठी मदत करण्याची तयारीही दर्शविण्यात आली होती. त्यानुसार दहा कुटुंबांनी स्वेच्छेने ताबा सोडून अन्य ठिकाणी स्थलांतर केले.
मात्र बिरजे, धमुने आणि पिंपरे या कुटुंबांनी स्थलांतरास नकार देत जागा रिकामी करण्यास नकार दिला. त्यामुळे इस्कॉनकडून मूळ दावा क्रमांक ३९०, ३९२, ५०८ आणि ४८९/२०१७ असे दावे दाखल करण्यात आले. संबंधित चार कुटुंबांनी या निर्णयाविरुद्ध अपील दाखल केले; परंतु न्यायालयाने ती अपील फेटाळून लावली.
यानंतर न्यायालयाने ई.पी. क्रमांक १४४, १४५, १४६ व १४७ द्वारे आदेश देत संबंधित घरे मोकळी करून जागा इस्कॉनच्या ताब्यात देण्याचे निर्देश दिले. त्या आदेशानुसार बेलिफामार्फत नियमानुसार कारवाई करण्यात आल्याचे इस्कॉनने स्पष्ट केले आहे.
सत्य परिस्थिती अशी असताना काही वृत्तपत्रे व समाजमाध्यमांवर चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसिद्ध होत असल्याचे नमूद करून नागरिकांनी अशा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन इस्कॉनच्या वतीने करण्यात आले आहे.
