बेळगावच्या मध्यवर्ती बाजारपेठेत सुरू असलेल्या रस्ते खोदकामांच्या संथ गतीमुळे व्यापारी व नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून याबाबत आमदार राजू सेठ यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे. रामदेव गल्ली, खडे बाजार, समादेवी गल्ली, हुन्स टॉकीज रोड, नार्वेकर गल्ली, गोंधळी गल्ली, मारुती गल्ली, भेंडी बाजार तसेच लगतच्या परिसरातील व्यापाऱ्यांनी एकत्र येत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. हे सर्व भाग बेळगाव शहराच्या प्रमुख व्यापारी केंद्रात मोडतात.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की गेल्या अनेक आठवड्यांपासून रस्ते खोदून तसेच सोडून दिल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. नियोजनशून्य कामकाजामुळे धुळीचे प्रमाण प्रचंड वाढले असून नागरिकांना श्वास घेण्यास त्रास, डोळ्यांची जळजळ आणि आरोग्याच्या तक्रारी उद्भवत आहेत. खोल खड्डे आणि उंच-सखल रस्त्यांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
व्यापाऱ्यांनी सांगितले की ग्राहक बाजारपेठेकडे येण्यास टाळाटाळ करत असल्याने व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. दुकानांतील मालावर सतत साचणाऱ्या धुळीमुळे नुकसान होत आहे. याशिवाय खोदकामामुळे अनेक व्यापारी व निवासी भागांमध्ये जवळपास महिनाभर पाणीपुरवठा खंडित असल्याची गंभीर तक्रारही करण्यात आली आहे.
लग्नसराईचा हंगाम तोंडावर असताना काम पूर्ण करण्यात होणारा विलंब हा अत्यंत गैरजबाबदारपणाचा नमुना असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत विकासकामे स्वागतार्ह असली तरी ती नागरिकांच्या आरोग्य व व्यवसायाच्या बळीवर होऊ नयेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
व्यापाऱ्यांनी दिवसातून किमान चार वेळा पाणी शिंपडून धूळ नियंत्रणात आणावी, अतिरिक्त वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, खोदलेल्या रस्त्यांवर तात्पुरते डांबरीकरण करावे, काम पूर्ण करण्याचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा, पाणीपुरवठा तात्काळ सुरू करावा आणि कामावर कडक देखरेख ठेवावी, अशा मागण्या केल्या आहेत.
बेळगाव क्लॉथ मर्चंट्स असोसिएशन (BCMA) आणि ट्रेडर्स कौन्सिलने प्रशासनाशी सहकार्याची भूमिका कायम ठेवत तातडीने ठोस निर्णय घ्यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.
याबाबत आमदार राजू शेठ यांनी मंगळवारी सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली असून आठवड्याभरात शहरातील सर्व रस्ते पूर्ववत केले जातील असे आश्वासन त्यांनी व्यापाऱ्यांना दिले आहे.
