बेळगाव | 13 जुलै 2025
श्री घूमटमाळ मारुती मंदिर ट्रस्ट व बी. के. बांडगी शैक्षणिक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी परीक्षेत तालुक्यातील मराठी शाळांमधून प्रथम आलेल्या विद्यार्थिनींचा गौरव सोहळा रविवारी मारुती मंदिर सभागृहात उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते रयत शिक्षण संस्थेचे निवृत्त प्राचार्य श्री. शामराव पाटील होते. अध्यक्षस्थानी ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रकांत बांडगी, तर पाहुणे म्हणून बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील आणि ट्रस्टचे उपाध्यक्ष कुलदीप भेकणे, सचिव प्रकाश माहेश्वरी हे मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात कै. बी. के. बांडगी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलनाने झाली. अनंत लाड यांनी प्रास्ताविक, तर चंद्रकांत बांडगी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
या कार्यक्रमात तालुक्यातील 30 शाळांतील प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थिनींना रोख ₹1000, स्मृतीचिन्ह, आणि प्रशस्तिपत्रक प्रदान करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्र हायस्कूलची ऐश्वर्या मानकोजी ही विद्यार्थिनी विशेष उल्लेखनीय ठरली. तिने आपल्या भावना व्यक्त करताना कृतज्ञतेचे भावपूर्ण भाषण केले.
आमदार अभय पाटील यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सांगितले,
“आजच्या यशामागे तुमचे गुरू व पालक आहेत, त्यांना कधीही विसरू नका. पुढे कितीही प्रलोभने आली, तरी आपल्या कुटुंबाच्या व समाजाच्या प्रतिष्ठेचा विचार करा. देश, समाज आणि भाषा यांच्यावर निष्ठा ठेवा.”
प्राचार्य शामराव पाटील यांनी विद्यार्थिनींना प्रेरणादायी विचार दिले –
“सुखाने, विचाराने व संस्काराने जगावं, आणि समाजासाठी काही करता आलं पाहिजे. आत्मचरित्र वाचा, त्यातून जीवनाला दिशा मिळेल. शिक्षण घेताना आपणास झेपेल, परवडेल आणि यशस्वी करील असे शिक्षण निवडा.”
कार्यक्रमात हिरालाल पटेल व सुनील सरनोबत या नव्याने नियुक्त ट्रस्टींचा आमदारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचा समारोप रघुनाथ बांडगी यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.
कार्यक्रमाला ट्रस्टी, विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि अनेक समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.