कष्टाला जिद्दीची जोड दिल्यास यश नक्की मिळते – प्रा. अशोक अलगोंडी

कष्टाला जिद्दीची जोड दिल्यास यश नक्की मिळते – प्रा. अशोक अलगोंडी

बेळगांव : मराठा मंडळ जिजामाता हायस्कूल, चव्हाट गल्ली येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींसाठी आयोजित सदिच्छा कार्यक्रम १० फेब्रुवारी रोजी उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री. एन. डी. पाटील सर होते, तर मराठी बाण्याचे कवी प्रा. अशोक अलगोंडी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.

दहावी ही आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची पायरी असल्याचे सांगत प्रा. अलगोंडी यांनी विद्यार्थिनींना आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाण्याचा मौलिक सल्ला दिला. “कष्टाला जिद्दीची जोड दिल्यास यश नक्कीच मिळते,” असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला. वाचन संस्कृती बळकट करण्यासाठी विद्यार्थिनींनी नियमित वाचनाची सवय लावावी, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. स्त्री शिक्षणाचा ध्यास घेणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची आठवण करून देत “आम्ही सावित्रीच्या लेकी” हा विचार मनामनांत रुजविण्याचे आवाहन त्यांनी केले.

प्रमुख पाहुणे गुरुनाथ किरमटे सर यांनी मुलींना संघर्षाची आणि जबाबदारीची जाणीव करून देत जीवनात शिस्त, संयम आणि चिकाटी यांचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाला खानापूरचे निर्भीड पत्रकार मिलिंद देसाई, चव्हाट गल्ली क्लस्टरचे सीआरपी राजू बेळगुंदकर, मराठी ५ नंबर शाळेचे मुख्याध्यापक मुचंडीकर सर तसेच एम. के. पाटील सर उपस्थित होते.

शिस्तबद्ध अशा पथसंचलनाने दहावीच्या विद्यार्थिनींनी सभागृहात प्रवेश केला. सुमधुर स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कविता फडके यांनी प्रास्ताविक सादर केले, तर शुभांगी पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतातून शाळेबद्दलचा जिव्हाळा व्यक्त करत शिस्त, संयम आणि माणुसकीची शिकवण देणारी ही शाळा सदैव हृदयात राहील, असे सांगितले. सहशिक्षिका आशा पवार यांनी जिद्द आणि चिकाटीच्या बळावर कोणतीही असाध्य गोष्ट साध्य करता येते, हे पटवून दिले.

यावेळी २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात यशस्वी ठरलेल्या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. कु. वैष्णवी भडागे, सानिका हिरोजी आणि आरती मुरकुटे यांनी राष्ट्रीय पातळीवर खेळात उल्लेखनीय कामगिरी करून शाळेचा गौरव वाढविला, त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच यावर्षीच्या आदर्श विद्यार्थिनी म्हणून कु. अस्मिता चौगुले आणि प्रतीक्षा पाटील यांचा गौरव करण्यात आला.

अध्यक्षीय भाषणात श्री. एन. डी. पाटील यांनी कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात स्वतःपासून करावी आणि सकारात्मक दृष्टिकोन कायम ठेवावा, असे विचार मांडले. अंजली चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले, तर रेश्मा पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 − two =

error: Content is protected !!