चलवेनहट्टी महिलांकडून बेक्कीनकेरे महालक्ष्मी मातेच्या चरणी ११ तोळ्यांचा चांदीचा राणीहार अर्पण

चलवेनहट्टी महिलांकडून बेक्कीनकेरे महालक्ष्मी मातेच्या चरणी ११ तोळ्यांचा चांदीचा राणीहार अर्पण

बेक्कीनकेरे गावची ऐतिहासिक महालक्ष्मी यात्रा तब्बल ६६ वर्षांनंतर मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आली असून संपूर्ण पंचक्रोशीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. या यात्रेनिमित्त चलवेनहट्टी येथील महिलांनी आपल्या माहेरच्या देवीप्रती असलेली श्रद्धा आणि प्रेम व्यक्त करत ११ तोळ्यांचा चांदीचा राणीहार महालक्ष्मी मातेच्या चरणी अर्पण केला.

चलवेनहट्टी आणि बेक्कीनकेरे या दोन्ही गावांमध्ये अनेक वर्षांपासून घट्ट नातेसंबंध आहेत. विशेषतः विवाहबंधनातून या दोन गावांतील मुलींची नाती आजही टिकून आहेत. बेक्कीनकेरे गावातून चलवेनहट्टी येथे विवाह करून आलेल्या महिलांनी या ऐतिहासिक यात्रेचे औचित्य साधत माहेरच्या देवीला राणीहार भेट दिला आणि देवीची कृपादृष्टी सदैव राहो, अशी मनोभावे प्रार्थना केली

या दागिन्याची मिरवणूक धनगरी ढोलांच्या गजरात आणि भंडाऱ्याच्या उधळणीत मोठ्या जल्लोषात काढण्यात आली. नागनाथ मंदिर येथून सुरू झालेली ही भव्य मिरवणूक महालक्ष्मी मंदिरात दाखल झाली. मिरवणुकीत महिला डोक्यावर मंगल कलश घेऊन पारंपरिक वेशात सहभागी झाल्या होत्या, ज्यामुळे सोहळ्याची शोभा अधिकच वाढली.

महालक्ष्मी यात्रा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी हा राणीहार स्विकारून तो महालक्ष्मी मातेच्या मूर्तीला विधिवत परिधान केला. दागिना अर्पण करणाऱ्या महिलांचे यात्रा उत्सव समितीच्या वतीने विशेष कौतुक करण्यात आले. उपस्थित प्रत्येक महिलेला नारळ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी रेणुका अशोक पाटील, लीला हुंदरे, रेणुका पाटील, राधिका पाटील, नंदा पाटील, लक्ष्मी सनदी, लक्ष्मी हुंदरे, लक्ष्मी पाटील, यल्लु पाटील, सुनिता पाटील, लक्ष्मी यल्लाप्पा पाटील, लक्ष्मी सिद्राय पाटील, मुक्ता हुंदरे, इरव्वा पाटील, कविता पाटील, सुनंदा हुंदरे, इंदू हुंदरे, मल्लव्वा हुंदरे, प्रियंका हुंदरे, मलप्रभा पाटील, शोभा कंलखाबकर, आनंदा पाटील, लक्ष्मी कृष्णा पाटील, पूजा परशराम पाटील आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

६६ वर्षांनंतर आयोजित करण्यात आलेल्या या ऐतिहासिक यात्रेत चलवेनहट्टी महिलांच्या या भावनिक आणि भक्तिपूर्ण योगदानामुळे सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

2 × one =

error: Content is protected !!