बेळगाव | 13 जुलै 2025
विमल फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘बिग बॉक्स क्रिकेट लीग’ या बहुप्रतिक्षित इनडोअर क्रिकेट स्पर्धेचे भव्य उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. उद्घाटन सोहळा इंडोर अकॅडमी, बेळगाव येथे थाटामाटात पार पडला.
उद्घाटनप्रसंगी विमल फाउंडेशनचे अध्यक्ष किरण जाधव, कुलदीप मोरे आणि हेमंत लेंगडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी खेळाडूंना शुभेच्छा देत ‘खेळातून संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित होतात,’ असा संदेश दिला.
या स्पर्धेत एकूण सहा संघांनी सहभाग नोंदवला असून, पुढील दोन दिवस चुरशीच्या लढती रंगणार आहेत. विविध संघांमधील सामन्यांमध्ये युवा खेळाडूंच्या दमदार कामगिरीचे साक्षीदार होण्याची संधी क्रिकेटप्रेमींना मिळणार आहे.
विजेता व उपविजेता संघांना पारितोषिके देण्यात येणार असून, उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना वैयक्तिक सन्मान दिला जाईल.
‘बिग बॉक्स क्रिकेट लीग’ ही स्पर्धा केवळ मनोरंजनासाठी नाही, तर स्थानिक खेळाडूंना स्वतःची कौशल्यं सादर करण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरत आहे.
क्रिकेटप्रेमींसाठी ही स्पर्धा एक पर्वणी ठरणार असून, बेळगावातील खेळ संस्कृतीला चालना देणारा उपक्रम म्हणून याकडे पाहिले जात आहे.