बेळगाव–वेंगुर्ला रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा द्यावा; सीमाप्रश्नावर तोडग्यासाठी केंद्राशी चर्चा व्हावी – निलिमा पावशेंचे नितीन गडकरींना निवेदन

बेळगाव–वेंगुर्ला रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा द्यावा; सीमाप्रश्नावर तोडग्यासाठी केंद्राशी चर्चा व्हावी – निलिमा पावशेंचे नितीन गडकरींना निवेदन

नागपूर : बेळगाव–वेंगुर्ला रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करून त्याचा सर्वांगीण विकास करण्यात यावा, अशी ठाम मागणी बेळगाव महापालिकेच्या माजी नगरसेविका निलिमा पावशे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. नागपूर येथे झालेल्या एका खासगी कार्यक्रमात पावशे यांनी गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर निवेदन दिले व या विषयावर चर्चा केली.

बेळगाव हे औद्योगिक, ऐतिहासिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र असून कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा व कोकणातील नागरिकांसाठी आरोग्य, शिक्षण आणि व्यापाराचे प्रमुख केंद्र आहे. याच मार्गावरून गोव्यातील मOPA विमानतळ, चिपी विमानतळ, सिंधुदुर्ग बंदर तसेच गोवा व कोकणातील पर्यटनस्थळांपर्यंत मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते. चंदगड, आजरा, गडहिंग्लज, दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण आदी भागांतील नागरिक या मार्गाचा नियमित वापर करतात. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक ताण निर्माण झाला असून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.

हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून विकसित झाल्यास बेळगाव, गोवा, महाराष्ट्र व कोकण भागातील कृषी उत्पादने, भाजीपाला, जीवनावश्यक वस्तू, गोव्यातील सिमेंट व स्टील, तसेच मासे आणि कोकणातील हापूस आंबा यांच्या वाहतुकीस मोठा फायदा होणार आहे. यामुळे व्यापार-वाणिज्याला चालना मिळून संपूर्ण विभागाच्या आर्थिक विकासाला गती मिळेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले.

याच भेटीत कर्नाटक–महाराष्ट्र सीमाप्रश्नाबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली. हा दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न देशाचे प्रधानमंत्री व केंद्रीय गृहमंत्री यांच्याशी चर्चा करून तोडगा काढावा, अशी मागणी निलिमा पावशे यांनी केली. सीमावर्ती भागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी लक्षात घेता केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निवेदन स्वीकारून या मागण्यांचा गांभीर्याने विचार करण्याचे आश्वासन दिले, अशी माहिती देण्यात आली.यावेळी निलिमा पावशे यांच्यासोबत नागपूरच्या वसुंधराराजे भोसले उपस्थित होत्या सोबतच शैलजाताई खानविलकर आणि उज्वला कदम पाटील या उपस्थित होत्या.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four × five =

error: Content is protected !!