बेळगाव | 11 जुलै 2025
येणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाकडून मिरवणूक मार्गावरील कमी उंचीचे विद्युत खांब तत्काळ बदलण्यात यावेत, अशी मागणी हेस्कॉमचे कार्यकारी अभियंता मनोहर सुतार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली हा निवेदन कार्यक्रम पार पडला.
गणेश मूर्ती आणि देखावे उंच असल्याने, कमी उंचीच्या विद्युत खांबांमुळे मिरवणुकीदरम्यान अडथळा निर्माण होतो. मागील वर्षी काही मार्गांवर उंच खांब बसविण्यात आले होते. मात्र अद्यापही काही ठिकाणी हे खांब बदलण्यात आले नाहीत, अशी खंत महामंडळाने व्यक्त केली.
निवेदन स्वीकारताना मनोज सुतार यांनी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून बेळगाव शहरातील व उपनगरातील मिरवणूक मार्गांची सविस्तर माहिती घेतली आणि गणेशोत्सवापूर्वी आवश्यक त्या ठिकाणी विद्युत खांब बदलण्याचे आश्वासन दिले.
महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव व नगरसेवक गिरीश धोंगडी यांनी स्पष्टपणे सांगितले की, मिरवणुकीच्या मार्गावर कमी उंचीच्या खांबांमुळे उंच मूर्ती नेणं कठीण होते. त्यामुळे उंच खांब बसवणे अत्यावश्यक आहे. तसेच मिरवणुकीच्या मार्गावर तात्पुरत्या वीज जोडणी, देखावे व मूर्तींच्या सुरक्षेसाठी इतर आवश्यक सुविधांची मागणीही करण्यात आली.
विजय जाधव यांनी यावेळी हेस्कॉम अधिकाऱ्यांना विनंती केली की, गणेशोत्सव काळात तात्पुरत्या वीज जोडणीसाठी कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी निवेदनाची गांभीर्याने दखल घ्यावी.
या वेळी हेमंत हावळ, सुनिल जाधव, प्रवीण पाटील, गजानन हांगीरगेकर, सौरभ सावंत, आदित्य पाटील, अरुण पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाने वेळेत निवेदन देत प्रशासनाचा पाठपुरावा सुरू केला असून, गणेशोत्सव शांततापूर्ण आणि भव्य स्वरूपात पार पाडण्यासाठी सर्व प्रकारच्या तयारीसाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.