खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते स्वर्गीय अजितदादा पवार यांना आदरांजली वाहण्यासाठी राजा शिवछत्रपती स्मारक, खानापूर येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.
या शोकसभेच्या सुरुवातीला खानापूर तालुका महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, माजी आमदार दिगंबरराव पाटील, सरचिटणीस आबासाहेब दळवी, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, गोपाळ पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी एक मिनिटाचे मौन पाळून श्रद्धांजली वाहिली.
सभेचे प्रस्ताविक करताना सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी अजितदादा पवार यांच्या निधनावर विश्वास बसणे कठीण असल्याचे सांगत त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रासह सीमाभागात शोककळा पसरल्याची भावना व्यक्त केली.
माजी आमदार दिगंबर पाटील यांनी पवार कुटुंबावर जसा दुःखाचा डोंगर कोसळला आहे, तसाच तो सीमावासीयांवरही कोसळल्याचे सांगत खानापूरची जनता या दुःखात सहभागी असल्याचे नमूद केले व दिवंगत आत्म्यास चिरशांती लाभावी अशी प्रार्थना केली.
अध्यक्ष गोपाळराव देसाई यांनी सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी अजितदादा पवार हे सातत्याने समितीच्या नेत्यांच्या संपर्कात होते, असे सांगत त्यांच्या आकस्मिक निधनामुळे मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली. सीमाप्रश्नाची सोडवणूक हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे त्यांनी नमूद केले.
खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण करताना सांगितले की, आज महाराष्ट्रात सीमाप्रश्नाकडे गांभीर्याने पाहणारे मोजकेच नेते उरले असून त्यामध्ये अजितदादा पवार अग्रभागी होते. त्यांच्या निधनाने युवा पिढीला मोठा धक्का बसला असून सीमावासीयांचे अपूरणीय नुकसान झाले आहे. संघटित राहून सीमाप्रश्न लवकरात लवकर सोडवणे हीच खरी श्रद्धांजली असल्याचे त्यांनी सांगितले.
गोपाळ पाटील यांनी अजितदादा पवार यांची ओळख धडाकेबाज व धडाडीचे निर्णय घेणारे नेते अशी होती, असे सांगत त्यांच्या आशीर्वादरूपी सहवासाने सीमाप्रश्न सुटावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
विलास बेळगावकर यांनी अजितदादा पवार यांच्याशी संबंधित जुन्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली. तसेच कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, माजी सभापती मारुती परमेकर, तज्ज्ञ समितीचे सदस्य प्रकाशराव चव्हाण, पांडुरंग सावंत, राजाराम देसाई, रुक्मिणी झुंजवाडकर यांचीही श्रद्धांजलीपर भाषणे झाली.
यावेळी रणजीत पाटील, डी. एम. भोसले, रुक्मिणी झुंजवाडकर, पुंडलिक पाटील, मरू पाटील, कृष्णा मनोळकर, जयसिंगराव पाटील, विशाल बुवाजी आदी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
