शिवबसव नगर, बेळगाव | 10 जुलै 2025 : गुरुपौर्णिमेच्या पावन दिनाचे औचित्य साधून श्री देव दादा मठ, ज्योतिर्लिंग देवस्थान, शिवबसव नगर येथे दगडी चौथऱ्याच्या बांधकामाचे भूमिपूजन मोठ्या श्रद्धाभावाने पार पडले.
हा दगडी चौथरा त्या पवित्र स्थळी बांधण्यात येत आहे, जिथे दरवर्षी चैत्र पौर्णिमेनंतर “गोलातली जत्रा” साजरी केली जाते. या जत्रेत श्री देव दादा सासनकाठीची पूजा विशेष श्रद्धेने केली जाते. या झाडाखाली होत असलेल्या पूजेसाठी आता पक्क्या स्वरूपात दगडी चौथरा उभारण्यात येणार आहे.
या धार्मिक भूमिपूजन कार्यक्रमात श्री ज्योतिर्लिंग भक्त मंडळ, बेळगाव व श्री देव दादा सासनकाठी, चव्हाट गल्ली, बेळगाव भक्त मंडळ यांचे कार्यकर्ते व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून सुरेश तारीहाळ, नागेंद्र नाईक, लक्ष्मण किल्लेकर, प्राचार्य आनंद आपटेकर, ज्योतिबा धामणेकर, श्रीनाथ पवार, ज्योतिबा पवार आणि इतर मान्यवर ज्योतिर्लिंग भक्त उपस्थित होते.
हा चौथरा केवळ बांधकाम प्रकल्प नसून, श्रद्धेचा व भक्तीचा एक महत्त्वपूर्ण स्तंभ ठरणार आहे, असा विश्वास भाविकांनी व्यक्त केला.