बेळगाव / प्रतिनिधी :
आनंदवाडी येथील महिलांच्यावतीने पारंपरिक हळदी-कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला गल्लीतील ज्येष्ठ महिला श्रीमती यमुक्का सरनोबत तसेच पोलीस उपनिरीक्षक राजश्री कदम आणि महिला मंडळाच्या उपाध्यक्ष सौ. कल्पना भांदुर्गे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
कार्यक्रमादरम्यान चंदुकाका ज्वेलर्स यांच्या वतीने महिलांसाठी विविध मनोरंजक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये उखाणे, बादलीत बॉल टाकणे तसेच इतर खेळांचा समावेश होता. या स्पर्धांमध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला असून त्यामुळे कार्यक्रमातील आनंद अधिकच द्विगुणित झाला.
प्रमुख पाहुण्यांचे स्वागत सौ. माधवी सुतार, सौ. सुजाता पाटील व सौ. पूजा मुचंडी यांच्या हस्ते पुष्प देऊन करण्यात आले. चंदुकाका ज्वेलर्स यांचे स्वागत व आभार सामाजिक कार्यकर्त्या सौ. माधुरी जाधव यांनी मानले.
हा हळदी-कुंकू कार्यक्रम महिलांमधील एकोपा, सांस्कृतिक परंपरा आणि आनंदाचे प्रतीक ठरला असून उपस्थित महिलांनी अशा उपक्रमांचे कौतुक केले.
